top of page

अपघात रोखण्यासाठी मोकाट गुरांना रेडियम पट्यांचे कवच

रात्रीचे अपघात टाळता येणार; जनावरांचा रस्त्यावर मोकाट वावराला बसणार चाप


ree

तलासरी: तालुक्यात व महामार्गांवर मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यांवर बसत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी स्थानिक नागरिक व तरुणांनी पुढाकार घेत, या मोकाट जनावरांच्या गळ्यात आणि शिंगांना रिफ्लेक्टर रेडियम पट्टे लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे.


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि तलासरी तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांवर ही जनावरे खुलेपणाने फिरताना दिसून येतात. रात्रीच्या वेळी गाडीसमोर अचानक जनावरे येत असल्यामुळे चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर, वाहनचालकांना अंतरावरूनच जनावरे दिसावीत यासाठी रिफ्लेक्टर रेडियमचा वापर केला जात आहे.


या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी जनावरे लांबूनच दिसू शकणार असून, अपघात टाळण्यात मदत होणार आहे. विशेषतः डांबरी रस्त्यांवरील ऊब घेत बसलेल्या जनावरांचे कळप आता लांबूनच निदर्शनास येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तरुणांच्या या उपक्रमाचे स्थानिक पातळीवर कौतुक होत असून, हा उपक्रम अधिक व्यापक करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.


दरम्यान, यांत्रिकी शेती व विविध प्रकल्पांमुळे काही शेतकऱ्यांची जमीन गेल्याने त्यांनी आपल्या गुराढोरांना मोकाट सोडले आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसत आहेत. ही स्थिती लक्षात घेता, संबंधित ग्रामपंचायती, महामार्ग प्रशासन आणि नगरपंचायतींनी गुरांसाठी कोंडवाडे उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Comments


bottom of page