आदिवासी विद्यार्थी आंदोलकांच्या मागण्या मान्य: मंत्री वूइके
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 1 min read

आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आता नियमित शिक्षण, अध्ययन-अध्यापन आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले.
शासकीय वसतिगृहांसंदर्भातील विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर शासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात ४९० शासकीय वसतिगृहे सुरू आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही सुरू असून, पुणे विद्यापीठ परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार असून, जात वैधता प्रमाणपत्राबाबतही संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने साप व विंचू चावण्याच्या घटनांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. ‘पेसा’अंतर्गत नोकरभरतीला गती देण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून, डीबीटी आणि सेंट्रल किचनबाबत चर्चा व अभ्यासानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक कार्यवाही करत असून, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करावी, असे आवाहन मंत्री डॉ. वुईके यांनी केले.



Comments