आदिवासींचा पारंपारिक गवूरपूजन उत्साहात साजरा
- Navnath Yewale
- Sep 1, 2025
- 1 min read

डहाणू : पालघर-ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजात गवूरपूजनाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. शेतीची कामे संपल्यावर थकव्याला विराम देत महिलावर्ग, तरुण-तरुणी उत्साहाने या सणाची तयारी करतात. गवूर मातेचे पूजन हे निसर्गाशी जोडलेले एक अनोखे पूजन मानले जाते. कोळी मल्हार समाजाची एक ओळख मानली जाते.
गवूर पूजनात इंदईची फुले, दिंड्याची पाने, गायगोजी, गोहिल्या, गोमेठीचा ताना, दौडे, पेवे, तेरडा, करडू आदी रानफुलांचा उपयोग करून गौरीची सजावट केली जाते. पानाफुलांनी सजवलेल्या गौरीमातेभोवती नऊवारी साडी, नथ, मंगळसूत्र, बांगड्या घालून सुवासिनी देवीला सौभाग्यवतीचे रुप देतात.
पावलांची सजावट
गवूर पूजनापूर्वी घर स्वच्छ करून तांबड्या मातीने पट्टा मारला जातो. त्यावर तांदळाच्या पिठाचे हाताचे ठसे, बोटांचे ठसे आणि पावलांचे ठसे उमटवून संपूर्ण घर सजवले जाते. रांधायची खोली, चुलीची खोली, गोठा, देवघर याठिकाणी देवीच्या पावलांची चालवण केली जाते.
गीत-नृत्यांचा जागर
गौराय मातेच्या आगमनापूर्वी रात्री तरुण-तरुणी गवरी गीत गातात, गवरी नाच, ढोल नाच आणि तारपा नाच सादर करतात. गावागावांतून या नृत्य-गायनाचा जागर रात्री उशिरापर्यंत चालतो. गवूर पूजनाच्या रात्रीही नाच-गाणी करून उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.
पारंपरिक नैवेद्य
गवूर मातेच्या पूजनात मासळीच्या भाज्यांचा नैवेद्य देण्याची पद्धत आजही टिकून आहे. कोलंबी, खेकडे आणि लहान माशांच्या भाज्यांचे नैवेद्य गौराय मातेपुढे अर्पण केले जाते.
गवूरी चालवणे
गौराय मातेचे आगमन संध्याकाळी केले जाते. घराच्या ओट्यावरून आतपर्यंत पावलांची सजावट केली जाते. कुंकू-हळदीच्या ठशांनी देवीच्या पावलांची चालवण सुवासिनी करतात. सासूपासून सुनेपर्यंत चालत आलेली ही परंपरा आजही तशीच जपली जाते.गौराय माता दुसऱ्या दिवशी सवाशीन शेतामध्ये, वाहत्या पाण्यात ठेवली जाते. त्यावेळी महिलावर्गाचा मोठा मेळावा जमतो. देवीला निरोप देताना गवूर गीतांचा जल्लोष होतो.
गवूरपूजन आणि इंदई वनस्पती
आदिवासी समाजात इंदई (Glory Lily) या वनस्पतीला गवूर मातेचे पवित्र रूप मानून पूजन केले जाते. सोबतच डिनेचे पान, पेवा, ठेरडा, गोमेठी, गयगव्हाऱ्या यांसारख्या औषधी वनस्पतींचेही सन्मानपूर्वक पूजन होते. या वनस्पतींचा आरास करून देवीला सुपात विराजमान केले जाते.वारली समाजात मात्र गवूर बसवण्याची प्रथा नाही. "वाघाने आमची गौर खाल्ली" या आख्यायिकेमुळे ते गवूर बसवत नाहीत, असे सांगितले जाते.गवूरपूजन हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्गपूजन, पारंपरिक कला, रानफुलांची शोभा आणि सामूहिक उत्साह यांचा संगम आहे. ग्रामीण-आदिवासी समाजात हा सण आजही तितक्याच श्रद्धा-भावनेने साजरा होत आहे.



Comments