आमदार आपल्या दारी उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निराकरण
- Navnath Yewale
- Jul 28
- 1 min read

डहाणू, (कासा) पालघर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत “आमदार आपल्या दारी” हा महत्त्वपूर्ण लोकसंपर्क उपक्रम पुण्य आचार्य भिसे हायस्कूल, कासा येथे उत्साही वातावरणात पार पडला. या उपक्रमात मतदारसंघातील विविध गावांमधून आलेल्या शेकडो नागरिकांनी सहभाग घेत आपापल्या समस्या, अडचणी आणि मागण्या मांडल्या.
या संवादमधून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, महसूल, वन विभाग व शासकीय योजनांचा लाभ या विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या ऐकून आमदार गावित यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. कार्यक्रमास डहाणूचे प्रांताधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी सादर केलेल्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्यावर जागेवरच चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
या वेळी आमदार गावित म्हणाले, “जनतेने मांडलेले प्रश्न प्राधान्याने सोडवले गेले पाहिजेत. जे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी तीन प्रतींसह अर्ज सादर केल्याने त्यांची मागणी अधिक प्रभावीपणे नोंदवली गेली. त्यामुळे शासकीय यंत्रणेला मागण्या वर्गवारीनुसार कार्यवाहीस गती देणे सोपे झाले.“आमदार आपल्या दारी” या उपक्रमामुळे प्रशासन थेट जनतेच्या संपर्कात येत आहे, आणि गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. प्रशासन आणि जनतेमधील विश्वास अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी दिसून आले.



Comments