आमदार जानकरांची माजी आमदार सातपुतेवर सडकून टीका
- Navnath Yewale
- Sep 22
- 2 min read

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चास संबोधीत करताना माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर कडवट शब्दात टीका केली.
आमदार जानकर म्हणाले की, सांगली जिल्ह्यात सध्या गलिच्छ विचारांंनी थैमान मांडलं आहे. तसा राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा एक माणूस आहे. आमच्याही सोलापूर जिल्ह्यात त्यांना अशा विचारांचा, इतका नालायक, बदमाश, हरामखोर माणूस सापडत नव्हता. म्हणून त्याला बीडमधून आणला. त्याचं नावा राम सातपुते आहे, त्याने जिल्ह्यात हैदोस घातलेला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अटलबिहारी वाजपेयी यांना मानणार्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन बेईमान राम सातपुते यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. विशाखापट्टनमहून आलेला एक टेंपो पंढरपूर पास करून माळशिरस तालुक्याच्या हद्दीत आला. पंढरपूर पोलिसांच्या पथकाने तो टेंपो माळशिरस हद्दीत पकडला, असे उत्तम जानकर यांनी नमूद केले.
जानकर म्हणाले, त्या टेंपोत साधारण दहा कोटी रुपयांचा गांजा होता. ज्यांनी पाठलाग करून गांजा पकडला होता, त्या पोलिसांना तो गांज्याचा टेंपो सोडून द्यावा लागला होता. कारण, राम सातपुते यांनी तेथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. देवाभाऊ असं असं झालं आहे. आता तिकडून कोण बोलतं कळायला मार्ग नाही. एका सेकंदात तो टेंपो सोडून द्यावा लागाला. ज्या पोलिसांनी तो पकडला होता, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कारवाई झालेले पोलिस माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. म्हणजे हे सर्व महाराष्ट्रात ठरवून घडवलं जात आहे, असा आरोप ही जानकर यांनी केला.
आमदार जानकर पुढे बोलताना म्हणाले की, परवा त्यांनी मारकवाडीच्या सरपंचाला प्रदेश कार्यालयात नेलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी मुलाखत दिली. सरपंच 91 टक्के मतं घेऊन निवडून आला आहे. असं हा दिवटा त्या पत्रकार परिषदेत सांगत होता. मला त्याला सांगायचं की, मारकवाडी आणि जतमधील निवडणुकीचं मतदान एकदा बॅलेट पेपरवर होऊन जाऊ दे असं आव्हानही आमदार जानकर यांनी दिले.


Comments