top of page

लोकसभेत प्रचंड गदारोळ: आठ खासदार निलंबी , महाराष्ट्रातील एकाचा समावेश, अध्यक्षांनी राहुल गांधींना रोखले...

नवी दिल्ली: संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी लोकसभेत जोरदार हंगामा झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण नियमांवर बोट ठेवत अध्यक्षांनी त्यांना रोखले. त्याचा प्रत्यय आजही लोकसभेत आला.


राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी आज पुन्हा चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधानांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी तालिका अध्यक्षांनी त्यांना केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यास सांगितले. काही मिनिटे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा व इतर मुद्यांवर भाष्य करत पुन्हा नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भाकडे आले. त्यांनतर मात्र तालिका अध्यक्षांनी त्यांना बोलण्यापासून रोखले आणि अन्य सदस्यांना बोलण्यास सांगितले.


तालिका अध्यक्षांच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या काँग्रेसच्या खासदारांनी त्यांच्या दिशेने कागद फेकत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले. कामकाजाला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर काँग्रेसच्या आठ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव सरकारकडून लोकसभेत मांडण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रातील खासदार प्रशांत पडोळे, अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुरदीप सिंग औजला, हिबी ईडन, मणकिम टागोर, किरण रेड्डी, वेंकट रमण आणि डीन कोरियाकोस यांचा यामध्ये समावेश आहे.


प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे या आठ खासदारांना आता संपूर्ण अधिवेशनाच्या काळात लोकसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही अध्यक्षांच्या दिशेने कागद फेकण्यात आले. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब केले. खासदारांच्या निलंबनाविरोधात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या आवारात निदर्शने करण्यात आली.


दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणावरून सलग दुसर्‍या दिवशी लोकसभेत गदारोळ झाला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह हे लोकसभेत उपस्थित होते. आज राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्या भाषणावेळी सभागृहात उपस्थिती होती. राहुल यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी बाकांवरील खासदारांकडूनही वारंवार आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे दोन्ही बाजुकडील खासदार आमनेसामने आल्याचे दिसून आले.

Comments


bottom of page