top of page

राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतली मोदी, शाहची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिल्लीचं निमंत्रण!

नवी दिल्ली: अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबत चर्चांना उधान आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा दावा केला जात होता, मात्र आता पटेल यांनी हे वृत्त खोटे असा दावा केला आहे. आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे पटेल म्हणाले. त्यांनतर आता पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती त्यांना दिली. तसेच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समोर आले आहे. आज एनडीए संसदीय दलाच्या बैठकीनंतर या तीन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.


दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रफुल्ल पटेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी या लोकांना यात राजकारण दिसत आहे असं विधान प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर केले. त्यामुळे अमित शाह आणि भाजप यांचा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला विरोध तर नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अजित पवार यांचे विधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांना दिल्लीला घेऊन या असं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पटेल यांना दिल्याची माहिती आहे.


प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलताना म्हणाले की,विलिणीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी काही चर्चा झाली नाही. विलिनीकरणाबाबत आम्हाला माहत नाही असं होऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमीका घेतली होती. स्थानिक स्वराज्यमध्ये दादांनी सांगितलं आपण सर्व वेगवेगळे लढत आहोत. आपली मते विभागली तर फरक पडू शकतो. त्यामुळे शरद पवार गटाशी बोलून समन्वय घडवू असं अजित दादा म्हणाले होेते एवढीच चर्चा झाली, असे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या.

Comments


bottom of page