top of page

एसटीच्या सुरक्षीत प्रवासाला बसस्थानकातच हरताळ? बीडचे शिरुर (का) तालुका बसस्थानक सीसीटीव्हीच्या प्रतिक्षेत!, प्रवाशी सुरक्षा वार्‍यावर


बीड: ‘एसटी चा प्रवास, सुखकर आणि सुरक्षीत प्रवास’ हे ब्रिद घेवून कित्तेक दशकं एसटीबस प्रवाशांच्या सेवेत तत्पर आहे. बसस्थानकात नागरिसुविधांपासून त्यांच्या सुरक्षेसाठी चोख, सक्षम उपाय योजना राबवण्यात येत असल्या, तरी बीडच्या शिरुर कासार तालुक्याच्या बसस्थानकातच सीसीटीव्ही कॅमेर्‍या अभावी प्रवाश्यांची सुरक्षा धोक्यात आहे.


एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तु, पैसे, सोन्या-चांदीच्या दागिण्यांवर हातसफाई, चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. खासकरून बसस्थानकात पाळत ठेवून बसमध्ये चढताना महिलां प्रवाशी भुरट्यांचे सावज बनतात. प्रत्यक्षात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांचा जागता पाहारा असताना चोरीच्या घटना घडत आहेत. लूट होवूनही नशिबाला दोष देत कपाळावर हात मारून धायमोकलून हंबरडा फोडण्याच्या व्यतिरिक्त बहूतांश महिला पोलिस तक्रारीपासून दूर राहतात.


पाळत ठेवून एसटी प्रवासातही महिलांच्या पर्स, बॅगांवर हातसफाईचे प्रकार समोर येत आहेत. अपवादाने एखाद्या प्रवाशाने हरकत घेतली तरच पोलिस ठाण्यापर्यंत बस पोहोचते मात्र, अशाही बहूतांश प्रकरणात पोलिसांच्या हाती काही लागत नाही. कारण वाहक, चालकांसह प्रवाशांची नजर चुकून चोरटा, चोरट्या कधीच फरार झालेल्या असतात.


महामंडळाकडे नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक बसमध्ये प्रवाशांच्या हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असल्याने ई-बसच्या प्रवासात चोरीच्या घटनांना काही प्रमाणात चपराक बसली आहे. कित्तेक वेळा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेवून बसमध्ये चढतानाच महिला प्रवाशांना चोरीसाठी सावज बनवण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत तसा बीडस्थानकातील एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.


दरम्यान, लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासात पाळत ठेवून महिला प्रवाशांच्या पर्स, बॅगांमधील सोन्या, चांदीचे दागिणे, मौल्यवान वस्तू हातसफाईने चोरीच्या घटना घडतात. एसटी प्रवासामध्ये झालेली लूट प्रत्यक्षात प्रवास संपलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर समाना काढताना लक्षात येते त्यामुळे नेमकी लूट कोठे झाली? कोणत्या ठिकाणी झाली? तेथील पोलिस ठोण कोणते? बस प्रवासात शेजारी कोण बसले? कोणाकडे जाऊन दाद मागावी? या असे अनेक प्रश्न आ वासून डोळ्यासमोर उभे राहत असल्याने कित्तेक प्रकरणं रेकॉर्डवर येत नाहीत. एसटी बसस्थानकात स्वच्छता, सुरक्षेसह विविध नागरिसुविधांसाठी महामंडळ, शासनास्तरावरून उपाय योजना राबवण्यात येत आहेत. मात्र, तालुक्याचे ठिकाण असतानाही गेल्या वीस वर्षापासून शिरूर बसस्थानकात अद्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा नाही, रस्त्याचा अभाव यासह सीसीटीव्ही अभावी सुरक्षेचा गंभीर प्रश्न कायम आहे. शहरातील राजुरी-चिंचपूर मार्गावर असलेले बसस्थानक मुख्य रस्त्यालगत आहे.


मात्र, सायंकाळी 5:00 वाजल्या नंतर कुठल्याच प्रवाशांना सुरक्षेची शाश्वती नसल्याने बसस्थानकात स्मशानशांतता ठरलेलीच, महामंडळ प्रशासनाने तात्काळ प्रवाशी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. अन्यथा बीडच्या आगारव्यवस्थापक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशराही संतप्त प्रवाशांकडून देण्यात आला आहे.


बसस्थानकावरील ध्वनी सूचना: बसस्थानकांवर प्रवाशांना मागड्या वस्तू, मोबाईल, पाकिटं, सोन्या, चांदीचे दागिणे सुरक्षीत ठेवा. चोरांपासून सावध राहण्याची ध्वनी सूचना प्रवाशांसाठी नेहमीचीच ठरत असल्याने प्रत्येक नागरिक प्रवासीलक्ष्य साधण्याच्या गडबडीत असतो. त्यामुळे बसस्थानकावरील चोरीच्या घटनांना चपराक बसण्यात हालचाल टिपणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मोलाचे योगदान आहे.


बसस्थानकावर कायमस्वरुपी बंदोबस्त नसला तरी रात्रीची पेट्रोलिंग, दिवसा आनेकवेळा पोलिस कर्मचारी बसस्थानकाचा आढावा घेण्यासाठी राऊंड मारतात. लवकरच बसस्थानकावर सीसीटीव्ही बसवण्यासाठी शिरुर पोलिस ठाण्याच्या वतिने विभाग नियंत्रक बीड यांना पत्रव्यवहार करणार आहोत.

प्रविण जाधव

(पोलिस निरिक्षक पोलिस ठाणे शिरुर कासार)


शिरुर कासार बसस्थानकामध्ये प्रवाशी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच मंजूर झाल्यानंतर बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील.

राजकुमार दिवटे

(जिल्हा वाहतूक नियंत्रक बीड आगार)

Comments


bottom of page