कारने बारामतीला जाणारे अजित पवार प्रफुल्ल पटेलांमुळे विमानाने गेले आणि अपघात झाला! कल्याणमधील सर्वपक्षीय शोकसभेत प्रमोद हिंदूराव यांची धक्कादायक माहिती

कल्याण: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी कारने रस्तामार्गे बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारीही झाली होती. परंतु आयत्या वेळीस एक महत्वाचे काम घेऊन प्रफुल्ल पटेल आले. त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कारऐवजी दुसर्या दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. त्याच विमानाला अपघात झाला आणि आपण अजितदादांना गमावले, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अजिदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयेाजन मंगेश बँक्वेट सभागृहात करण्यात आले होते.
अजितदादांच्या अपघाताची बातमी आपल्याला फोनद्वारे समजली. लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यांनतर पुढील तीन तास आपण सुन्न झालो होतो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजितदादा बारामतीमध्ये सभा घेणार होते. सभेला जाण्यासाठी आदल्या दिवशी संपूर्ण तयारी केली. सर्व सामान कारगाडीत भरले, जाण्याची तयारी झाली तेवढ्यात प्रफुल्ल पटेल यांनी एका कुठल्यातरी कामाची फाईल आणली. ते काम करता करता उशिर झाला आणि अजितदादांनी मोटारीने जाण्याऐवजी दुसरे दिवशी विमानाने जाण्याचे ठरविले. त्यानंतर अकल्पित घटना घडली, अशी आपल्याला माहिती मिळाल्याचे प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या श्रद्घांजलीपर भाषणात सांगितले.
अजितदादांबरोबर आपले 39 वर्षे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांचा दुसरे दिवशी होणारा कार्यक्रम आपल्याकडे नेहमी पोहचत असे. दादांच्या अनेक कामांचे आपण साक्षीदार आहोत. कल्याणला आपल्या घरी दादा आणि सुनेत्रा वहिनी अनेकदा येऊन गेले.दादांनी शेवटची भेटआपल्या घरी दिली तेव्हा आपण त्यांना माळशेज घाटापर्यंत सोडायला गेलो होतो. त्यासमयी झालेल्या संवादाची माहिती देत हिंदूराव यांनी दादांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे म्हणाले की, जन्म व मृत्यू माणसाला कळत नाही, त्यांनी केलेले काम हे ज्या वेळेस ती व्यक्ती मरण पावते व त्यांच्या अंत्यविधीला जनसमुदाय जमतो तेव्हा त्यांनी केलेल काम किती मोठे आहे हे समजते.
अजितदादांनी बारामती मॉडेल तयार केले. ते एकदा जाऊन बघा. दादांनी जेक काम केले तसे काम प्रत्येक प्रभागात प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात करा व दादांना कामातून श्रद्धांजली अर्पण करा, असे सांगून जगन्नाथ शिंदे म्हणाले की आपण सातवीत असल्यापासून शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित झालो. भुवनेश्वर येथे झालेल्या अधिवेशनाला उपस्थित राहून प्रेरणा घेतली. गेल्या वर्षी आपला 75 वा वाढदिवस साजारा झाला. त्यासमयी आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक विवाह सोहळ्यास व रक्तदान शिबीरास दादांनी हजेरी लावली. फक्त दहा मिनिटांसाठी येतो म्हणणारे दादा एक तास दहा मिनिटे थांबले.
या शोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश लटके, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष वंडार-पाटील , राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुभाष गायकवाड, नगरसेवक वरुण पाटील, माया कांबळे, माजी नगरसेवक संजय पाटील, प्रकाश तरे, ठाकरेसेनेचे शहरप्रमुख बाळा परब, आम आदमी पक्षाचे शैलेश जोगदंड, मराठा ज्ञाती समाजाचे योगश देशमुख, शिंदे सेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे, पत्रकार विष्णुकुमार चौधरी, उत्तम रोकड , रमेश साळवे, रमेश बर्वे, प्रशांत माळी, राणी कपोते, नितीन सकपाळ, स्वप्निल ताकावणे, पासनीस तिवारी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष स्वप्निल रोकडे, दिप ठाकूर, शत्रुघ्न भोईर, डॉ. प्रदिप जगताप यांच्यासह सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उस्थित होते.
यशंतराव चव्हाणांच्या विचार विद्यापिठातून तयार झालेला शेवटचा लोकनेता : ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनीही यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादा पवारांबाबत बोलताना यशवंतराव चव्हाणांच्या विचार विद्यापिठातून तयार झालेला शेवटचा लोकनेता, असे वर्णन त्यांनी केले. दादांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपुरे राहिले महाराष्ट्राने एक अभ्यासू व चांगला लोकनेता गमावला आहे. अजितदादांना ग्रामीण व शहरी भागाची पूर्ण माहिती होती. दादा हे महाराष्ट्राच्या मातीतील नेते होते. बुवाबाजी व कर्मकांडावर दादांचा विश्वास नव्हता त्यांनी कधीही हाताला गंडेदोरे बांधले नाहीत. अजितदादांचा आदर्श आपण घेतला पाहिजे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.



Comments