काहींना आरक्षण महत्वाचं, तर काहींना मी सत्तेवर असू नये वाटतं - मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- Aug 11
- 1 min read

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला ‘चलो मुंबई’ चा नारा दिला आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी जरांगे पाटील मुंबई आंदोलनावर ठाम आहेत. राज्यभरात पारावरच्या बैठकांच्या माध्यमातून आंदोलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. त्यातच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी ‘ चलो मुंबई’ चा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यासाठी राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी मुंबईला यायचं असे अवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच भाजपचा डिएनए ओबीसी असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर नुकत्याच ओबीसी मेळाव्यामध्ये ओबीसींसाठी लढणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यामुळे जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत. छत्रपतींच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री मराठ्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा खेद वारंवर व्यक्त करत आहेत.
मागण्यावर ठाम असलेले जरांगे पाटील मुंबई आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेसह मुंबई आंदोलना विषयी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे, काहींना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे. तर त्यावर काय उत्तर द्यायचं. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनावर अधिक बोलणं टाळल्याचं दिसून आलं.
Comentários