खासदार सोनवणेंचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप, माझ्या मुलाला आडकविण्यासाठी वाल्मिक कराडचे कारागृहातून फोन आमदार धनंजय मुंडे तडकाफडकी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्यासाठी वाल्मिक कराडने कारागृहातून फोन केल्याचा दावा करत खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरूवारी (दि.1) पत्रकार परिषदेत कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवून रेकॉर्डिंग पुरावा म्हणून माध्यमांना दिला. वाल्मिक कराडने कारागृहात कर्मचार्यांना आयफोन वाटप केल्याचा गंभीर आरोप करत प्रकरणाच्या चौकशीची मागणीही खासदार सोनवणे यांनी केली.
केज तालुक्यातील टाकळी येथे (दि.29 जून) 2026 रोजी हॉटेल चालक विलास घुले यांच्यावर दोन गटांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेले असताना धारदार शस्त्राने हल्ला झाला होता. यात विलास घुले यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तापले होते. या प्रकरणात सुरुवातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली.
या प्रकरणात घुले कुटुंबीयांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा सहभाग आणि आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी पुरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. रास्तारोको आणि विलास घुलेचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणल्यानंतर पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव नोंदवण्यवात आले होते.
मस्साजोग (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड यानेच आपल्या मुलावरप गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यामध्ये अधिकारी, कर्मचार्यांना फोन केले होते, असा अरापे सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. पुरावा म्हणून फोन कॉल रेकॉर्डिंगची एक ऑडिओ क्लिप देखील सोनवणे यांनी माध्यमांना दिली.
यावर बजरंग सोनवणे यांनी हे आपल्या व मुलाच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा अरोप करत वेळ आल्यावर सगळे पुरावे समोर आणेल, असा इशारा दिला होता. माझा मुलगा दोषी असेल तर खुशाल चौकशी करा, कारवाई करा. अशी भूमिका सोनवणे यांनी घेतली होती. तीन महिन्यानंतर आता या प्रकरणात बजरंग सोनवणे यांनी आपल्या मुलाला अडकवण्यासाठी बीडच्या कारागृहातून थेट सूत्रे हलली, असा दावा केला आहे.
या कथित ऑडिओ क्लिपधील संवादानुसार खासदार बजरंग सोनवणेंच्या पोराला विलास घुले खून प्रकरणात अडकवा, त्याच्यावर गुन्हा दाखल कर, मृतदेह पोलिस ठाण्यात ठेवा, टाकीवर चढा तुला भगवान बाबाची शपथ, पण त्या गाभड्याला अडकवा असं वाल्मिक कराड बोलत असल्याचा दावा खासदार सोनवणे यांनी केला. तयवर प्रतिसाद समोर व्यक्ती हा ‘जी आण्णा, जी आण्णा’ करून घेतो, असे म्हणत आहे. यावर हा फोन बीड कारागृहातून वाल्मिक कराड यानेच केला होता, वाल्मिक कराडने तुरुंगातून फोन करून सुग्रीव कराडशी संपर्क साधला आणि आपल्या मुलाला विलास घुले हत्या प्रकरणात गोवण्यासाठी सूचना दिल्या, असा आरोप करत खासदार सोनवणे यांनी माध्यमांसमोर कथित फोनवरील संवादाची ऑडिओ क्लिप ऐकवली.
‘आज आपण खासदार म्हणून नव्हे,तर एक वडील म्हणून पत्रकार परिषद घेत आहोत, असे म्हणत सोनवणे यांनी मुलाला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. विलास घुले हत्या प्रकरणात सीआयडी आणि सीबीआयकडून तपास झाल्याचे सांगत, या तपासात आपल्या मुलाविरोधात ठोस तथ्य आढळले नसल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, त्यानंतर मुलाचे नाव या प्रकरणाशी जोडण्यासाठी नेमका कट कसा रचण्यात आला. याचा खुलासा आपण करीत असल्याचे सोनवणे म्हणले.
वाल्मिक कराडने तुरूंगातील कर्मचार्यांना आयफोन वाटले: वाल्मिक कराडने तुरुगांतील कर्मचार्यांना आयफोन वाटल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला. हे आयफोन नेमके कोणी दिले, ते तुरुंगात कसे पाहोचले आणि त्यांचा वापर कोणत्या पद्धतीने झाला, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
धनंजय मुंडे तडकाफडकी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला: राष्ट्रपवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमध्ये आज पत्रकार परिषदेत वाल्मिक कराड याची कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिपचा दावा करत माध्यमांना पुरावा म्हणून दिली. वाल्मिक कराडशी कार्यकर्ते तुरुंगात असूनही संपर्कात आहेत. त्यांच्या संपर्क होण्यावरून सोनवणेेंनी गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत खासदार सोनवणे यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. या संदर्भात गृहमंत्रालयाने लक्ष घालावं, राज्य सरकारने योग्य ती कारवाई करावी असं अवाहनही त्यांनी केलं. त्यातच आता आमदार धनंजय मुंडे तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी साह्याद्री अतिथिगृहावर दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही खासगी कामानिमित्त ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



Comments