खोपोली हत्याकांडाचे बीड कनेक्शन?, आमदार थोरवेंचे गंभीर आरोप .. त्या बॉडीगार्डचे वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यासाबेत फोटोंचा दावा
- Navnath Yewale
- Dec 29, 2025
- 2 min read

खोपोली: खोपोली शहरातील शिवसेनेच्या नगरसेविका तथा माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या निर्घुण हत्येप्रकरणाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला असून या प्रकरणाला आता बीड जिल्ह्याचे कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. मंगेश काळोखे यांच्यावर धारदार शस्त्राने तब्बल 13 वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. हा हल्ला अचानक नसून तो पूर्णपणे पूर्वनियोजित कटातून करण्यात आल्याचा संशय दिवसेंदिवस बळावत आहे. या खळबळजनक प्रकरणात आतापर्यंत खोपोली पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने सर्व आरोपींना 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान अनेक महत्वाचे धागेदोरे समोर येत असून आरोपींमधील परस्पर संबंध, फोन कॉल्स, हालचाली आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत.
दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी सांगितले की, या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील एक कुख्यात गुन्हेगार थेट सहभागी आहे. संबंधित आरोपी हा बीडमध्ये वॉन्टेड असतानाही रवी देवकर याने त्याला मुद्दाम खोपोलीत आणले आणि मंगेश काळोखे यांना संपवण्याचा कट रचण्यात आला, असा गंभीर आरोप आमदार थोरवे यांनी केला आहे.
या हत्येप्रकरणाचा संबंध वाल्मिक कराडशी आहे का? याबाबतही चर्चा सुरू असून यामुळे प्रकरणाला आणखी वेगळी वळण मिळाले आहे. मात्र या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. फरार आरोपींचा शेधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
मंगेश काळोखे हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या हत्येमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “ हा खून केवळ एका कार्यकर्त्याचा नसून संपूर्ण शिवसेनेवर झालेला हल्ला आहे.” रवी देवकरच्या बॉडीगार्डने मंगेश काळोखेवर जवळपास 13 वार केले आहेत. तो बीडचा आहे, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या सोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे हत्या प्रकरणात राष्ट्रवादी षडयंत्र असल्याचे म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनिल तटकरे यांच्यावरही आरोप केले आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली शहर व कर्जत मतदारसंघातील शिवसैनिक एकत्र येऊन न्यायासाठी कँडल मार्च काढणार असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे खोपोली व कर्जत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडूनही आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाईची मागणी होत आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, बीड कनेक्शन आणि कथित मास्टरमाइंड कोण याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचे पडसाद येत्या काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Comments