एफडीए च्या पथकावर मस्तवाल गुटखा माफियांचा हल्ला; महिला अधिकार्याला स्कॉर्पिओने चिरडण्याचा प्रयत्न, अधिकार्यांना जीवे मारण्याची धमकी
- Navnath Yewale
- Jun 10
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुटखा माफियांची दहशत आणि मुजरोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. वाळूंज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकावर गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला अन्न सुरक्षा अधिकार्यांला थेट स्कॉर्पिओखाली चिरडण्याचा प्रयत्न प्रयत्न करण्यात आला आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार 9 जून रोजी पहाटे पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रहीमपूर परिसरात एका आयशर ट्रकची तपासणी केली. तपाणीदरम्यान ट्रकमध्ये तब्बल 25 पोती प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला आढळून आला. यानंतर अधिकार्यांनी ट्रक जप्त करून पुढील कारवाईसाठी पोलिस संरक्षणाची प्रतिक्षा सुरू केली.
मात्र, त्याचेळी विनाक्रमांक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 5 ते 6 जण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अधिकार्यांना शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली. परिस्थिती अधिक गंभीर बनवत आरोपींनी महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केले आणि त्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालण्याचा प्रयत्न केला.
प्रसंगावधान राखत त्यांनी बाजूला उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. या गांधळाचा फायदा घेत आरोपींनी जप्त केलेला गुटख्याने भरलेला ट्रक घटनास्थळावरुन पळवून नेला. या घटनेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकारची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि धमकावणे यांसह विविध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, फरार आरोपी आणि पळवून नेलेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.



Comments