गंजाड साऊथ सिज डिस्टीलरीजमध्ये स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्या – प्रहार संघटनेची मागणी
- Navnath Yewale
- Aug 12
- 1 min read
सुरक्षा रक्षक भरतीत स्थानिकांना डावलल्याचा आरोप, कंपनीकडून महिनाभरात सुधारणा करण्याचे आश्वासन

डहाणू: तालुक्यातील गंजाड येथे कार्यरत असलेल्या साऊथ सिज डिस्टीलरीज या कंपनीत सुरक्षा रक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत स्थानिक युवकांना डावलून परप्रांतीयांना प्राधान्य दिल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदारांनी अलीकडील भरतीमध्ये स्थानिक युवकांना संधी न देता मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय व्यक्तींना नियुक्त केले. त्यामुळे स्थानिक तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात ठेकेदार व सुपरवायझर यांना विचारणा केली असता, "कंपनीकडून आदेश आहे की स्थानिक युवकांना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करू नये; घेतल्यास ठेका रद्द केला जाईल," असे सांगण्यात आल्याचा दावा प्रहार संघटनेच्या निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या डहाणू तालुका समितीने कंपनी व्यवस्थापनाकडे निवेदन सादर करून स्थानिक युवकांना तातडीने रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी केली. संघटनेचे म्हणणे आहे की, "स्थानिक युवकांना वगळून बाहेरील मजुरांना प्राधान्य देणे हा स्पष्ट अन्याय आहे. रोजगार देताना स्थानिकांना प्राथमिकता मिळाली पाहिजे."
यावेळी कंपनीचे व्यवस्थापक अशोक रजपूत यांनी संघटनेच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली. त्यांनी येत्या महिनाभरात होणाऱ्या नवीन सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक युवकांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. या बैठकीत प्रहार संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष निलेश कासट, डहाणू तालुका सचिव जितेश पाचलकर, माधव तल्हा, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुदाम कदम आदी उपस्थित होते
Comments