गडकिल्ल्यांची स्वच्छता संवर्धन व जतन मोहिम लोकमंत्र व्हावा; महाराष्ट्र प्रदूषण यंत्र मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांचे शिवजयंतीदिनी प्रतिपादन

युनेस्कोने दर्जा दिलेल्या राज्यातील ११ गडकिल्ल्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित स्वच्छता व संवर्धन मोहिम “मानाचा मुजरा, हटवूया कचरा” या जनजागृती उपक्रमाचे आयोजन शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले सुवर्णदुर्ग दापोली येथे करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांनी राज्यातील युनेस्कोने दर्जा दिलेल्या अकरा गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन व जतन ही मोहीम हा लोकमंत्र होण्याची गरज आहे असे प्रतिपादन या यावेळी केले आहे.
या कार्यक्रमाला दापोलीचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे गृहराज्यमंत्री श्री योगेश दादा कदम यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचे निमित्ताने मानाचा मुजरा हटवूया कचरा या मोहिमेचा जनजागृती उपक्रम हा राज्यातील इतर किल्ल्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून युनेस्कोने दर्जा दिलेल्या अकरा गडकिल्ल्यांची स्वच्छता व संवर्धन मोहीम ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राबवली जाणार आहे. या मोहिमेची संकल्पना मानाचा मुजरा हटवूया कचरा अशी असून शिवजयंतीच्या निमित्ताने आज सुवर्णदुर्ग दापोली येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री एम देवेंदर सिंह, भा. प्र.से. , जिल्हा परिषद सदस्य श्री अण्णा कदम हे देखील उपस्थित होते. अशाच पद्धतीच्या स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे आयोजन त्या त्या गडकिल्ल्या परिसरातील शिवप्रेमी संघटनेकडून करण्यात येणार असून त्याचे नियोजन श्री देवेंदर सिंह हे करीत आहेत.
यूनेस्को यांनी भारतातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी, खंदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे.या ऐतिहासिक किल्ल्यांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. आता या किल्ल्यांचा समावेश ऐतिहासिक जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सदरहू पर्यटक भेट देत असताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, खाण्याचे सामान उदा. लेज्, कोल्ड्रींगज् यांचे प्लास्टिक रॅपर्स व प्लास्टिक बाटल्या यामुळे या किल्ल्यांवर कचऱ्याची मोठी समस्या भेडसावत असते.
सदरहू किल्ल्यांची साफसफाई व स्वच्छता करण्यासाठी या किल्ल्यांच्या परिसरातील शिवप्रेमी व सामाजिक संस्था नेहमीच स्वच्छता मोहिमेचे आयोजन करून या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जरी या किल्ल्यांना युनोस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले असले तरी या किल्ल्यांची स्वच्छता, त्यांचे पावित्र्य व या ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे आवश्यक असून युनेस्कोच्या वार्षिक पाहणी अहवालात याबाबतचा दर्जा व गुणवत्ता याचे निकष सांभाळणे आवश्यक आहे. त्याबाबत राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून “मानाचा मुजरा, हटवूया कचरा” ही हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिम संपूर्ण राज्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून राबविण्यात येणार आहे.
सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जय शिवराय प्रतिष्ठान दापोली ही संस्था शिवजयंतीचा उत्सव साजरा करीत असते त्या निमित्ताने या स्वच्छता मोहिमेच्या जनजागृती उपक्रमाचा हा शानदार समारंभ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींसमोर आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील या ११ गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहिम ही त्या परिसरातील स्थानिक सामाजिक संस्थेच्या सहकार्याने संपूर्ण वर्षेभर आयोजित केली जाणार आहे. त्याकरीता त्या संस्थेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आर्थिक अनुदानदेखील देण्यात येणार आहे.



Comments