top of page

जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनापासून नाशिकच्या क्रांती मोर्चांचे समन्वयक अलिप्त?

9 hours ago
2 min read

नाशिक: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली असली, तरी त्यांना राज्यातील आंदोलकांकडूनच मोठा धक्का बसताना दिसत आहे. गेल्या वेळेस आंदोलनात हिरीरीने सभागी झालेल्या नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी या वेळी जरांगे पाटलांच्या आंदेालनात सहभागी न होण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.


गेल्या आंदोलनादरम्यान नाशिकच्या समन्वयकांनी मुंबईतील आंदोलकांसाठी हजारो लोकांच्या जेवणाची, पाण्याची आणि किरणा सामानाची मोठी रसद पुरवली होती. मात्र, यावेळेस नाशिकच्या समन्वयकांनी आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.


मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये अजिबात सुस्पष्टता नाही. मागण्या कशा पूर्ण होणार आणि त्या कायदेशीरदृष्ट्या कशा टिकणार, याचे स्पष्टीकरण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आंदोलनात उतरणार नाही, अशी भूमिका समन्वयकांनी घेतली आहे. जरांगे पाटलांसोबत असलेले कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासक यांचेही जरांगे ऐकत नाहीत त्यामुळे आंदोलनाची दिशा भरकटत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या वेळी कोणतीही पूर्वतयारी किंवा ठोस नियोजन नसताना मुंबईकडे गेलो, पतर आलो आणि जल्लोषही केला. परंतु शेवटी सरकारच्या अश्वासनांमुळे मराठा समाजाची फसवणूकच झाली, असा संताप समन्वयकांनी व्यक्त केला. गेल्या वेळी स्वत: चा पैसा आणि वेळ खर्च करून सर्व रसद पुरवूनही, आता केवळ प्रामाणिक भूमिका मांडल्यामुळे जरांगे पाटलांचे डिजिटल ट्रोलर्स आमच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.


वारंवारप सरकारडून फसवणूक होत असताना आणि आंदोलनाला स्पष्ट दिशा नसताना पुन्हा मुंबईला जाण्यात काहीच अर्थ नाही, असा सवाल करत नाशिकच्या समन्वयकांनी या वेळी मुंबईला न जाण्याचा आणि आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या अंतर्गत मतभेदामुळे मनोज जरांगे पाटलांच्या आगामी मुंबई आंदोलनासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मुंबई दौर्‍याची घोषणा केली. मुंबई जातानाच्या प्रवासात एकूण चार मुक्काम करणार असून पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करू, असे जरांगे पाटीलयांनी जाहीर केले. न्यायदेवतेचा सर्व मराठा समाजाने सन्मान करावा तसेच शांततेत आंदोलन करावे, असे विशेष आवाहन जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. पाटोदा (बीड जिल्हा), श्रीगोंदा (अहिल्यानगर जिल्हा), हडपसर (पुणे जिल्हा), खोपोली किंवा कोवरखैरणे (रायगड जिल्ला) असे चार मुक्काम करून पाचव्या दिवशी सकाळी 10 :00 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.

Comments


bottom of page