मुंबई आंदोलनात जरांगे पाटलांची कडक आचारसंहिता; पाच नियम पाळण्याचे आवाहन

अंतरवाली : मराठा आंदोलक पुन्हा एकदा चर्चेत आले असून , मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून ‘ चलो मुंबई’ चा नारा दिला आहे. मुंबईकडे निघणार्या मराइा बांधवांनी शांतता, शिस्त आणि आंदोलनाची आचारसंहिता पाळावी, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.
मराठा बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. “ मराठ्यांना मान खाली घालावी लागेल असं वागू नका,” असे आवाहन त्यांनी आंदोलकांनी केले सर्वांनी एकजुटीने आणि शिस्तीने पुढे जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंदोलनासाठी ठरवून दिलेल्या मार्गानेच सर्व वाहनांनी एकत्र प्रवास करावा, असं स्पष्ट निर्देश जरांगे पाटील यांनी दिले कुणीही स्वत:हून मार्ग बदलू नये. प्रवासादरम्यान कोणालाही धक्का लागू नये किंवा इजा होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आंदोलनात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यसाचे निर्देशही त्यांनी दिले. यापूर्वी काय घडले किंवा कोण काय बोलले, हे सर्व विसरून नव्या पद्धतीने शांततेत आंदोलन पुढे नेण्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाबाबतही जरांगे पाटील यांनी आंदोलकांना महत्वाचा संदेश दिला. देशातील आणि राज्यातील गोरगरिबांच्या पाठीशी न्यायदेवता उभी असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयाच्या नियमांचा आदर करण्याचे आवाहन केले. सरकारने मराठा समाजावरून अन्याय केला असला तरी न्यायदेवता गोरगरिबांवर अन्याय करत नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंतरवाली सराटी येथून मुंबईपर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर आरक्षणाचा हक्क मिळवून परत येईपर्यऐत संपूर्ण आंदोलन शांततेच्या मार्गांनेच झाले पाहिजे, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. दगडफेक, जाळपोळ किंवा हिंसाचारावला आंदोलनात कोणतीही जागा नसल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी किंवा प्रशासनाने आंदोलकांना अडवण्यासाठी बॅरिकेड्स उभारले, तरी आंदोलकांनी हिंसाचार करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. “ शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून आणि बुद्धिमत्तेने हे आंदोलन पुढे नेले पाहिजे.” असे ते म्हणाले. बॅरिकेड्स तोडण्याऐवजी रस्त्यावर शांततेत बसावे किंवा झोपावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, आंदोलनातील नियमांचे उल्लंघन झाल्यास आपण उपोषण आणि आंदोलन करणार नाही, असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे ‘ चलो मुंबई’ आंदोलनामध्ये शिस्त आणि शांततेला सर्वाधिक महत्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकशाही आणि शांततेच्या मार्गानेच मराठा आरक्षण हक्क मिळवण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आंदोलनाची दिशा काय राहणार आणि मुंबईतील आंदोलन कसे आकार घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



Comments