top of page

जरांगे पाटीलांची लाखोंच्या संख्येत मुंबईकडे कूच सरकारवर दबाव वाढला, मराठा उपसमिती किल्ले शिवनेरीकडे

ree

वारंवार मागण्या करूनही आणि इशारे मेळावे घेऊनही आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारने लक्ष न दिल्याने मराठा आरक्षणासाठी आता ‘ अखेरचा लढा’ असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्याचबरोबर हजारो गाड्यांचा ताफा आणि लाखो लोक ऐन गणेशोत्सवात मुंबईकडे येत असल्याने महानगरावर ताण येईल, हे गृहित धरून सरकार दरबारी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारचा संपूर्ण दिवस गणेशात्सवाबरोबरच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने गाजला. सुरुवातीला जरांगे पाटील यांना तितकेसे समर्थन मिळणार नाही, असा कायास अनेकांनी लावला होता.


मात्र, अनेकांचे अंदाज फोल ठरवून पहिल्यापेक्षा अधिक गर्दी घेऊन सरकारच्या दारात उपोषणासाठी जरांगे पाटील सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवाचा सण मुंबईसह राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. गणेशोत्वात मुंबई शहर आणि उपनगरांत मोठी गर्दी होते. याच काळात जर जरांगे पाटील उपोषणासाठी मुंबईत आले तर वाहतुकीसह इतरही प्रश्न उभे ठाकतील, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने मराठा उपसमिती जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याकरिता पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी असणार आहे. याच मुक्कामाच्या ठिाकणी राज्य शासनाची मराठा उपसमिती जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांसदर्भात मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार आदी मंत्री त्यांच्याशी चर्चा करतील. दरम्यान, नुकतीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोना संदर्भात मराठा उपसमितीची बैठक संपन्न झाली. त्यानंतर तातडीने समिती जरांगे पाटील यांच्या भेटीला शिवनेरीच्या पायथ्याशी रवाना झाली आहे त्यामुळे समितीची शिष्टाई यशस्वी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


राज्य सरकारच्या वतिने मनोज जरांगे पाटील यांना चर्चेसाठी निरोप देण्यात आला. त्यावर आपण चर्चेसाठी तयार असल्याचे जरांगे पाटील यांनी कळविले आहे. कितीही उशीर झाला तरी आपण शिवनेरीच्या पायथ्याला भेटू, रात्री चर्चा करू, असे विखे आणि सामंत यांना सांगण्यात आल्याचे खुद्द जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. जरांगे पाटील अद्यापपर्यंत शिवनेरीला पोहोचले नाहीत. काही किलोमिटरचे अंतर पार करायला त्यांना दोन-तीन तास लागत आहेत.


मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवृत्त न्यायमुर्ती संपत शिंदे यांच्या समितीला मुदवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येण्याची घोषणा करून त्यांच्या प्रवासाला सुरुवात होण्याच्या 24 तास आधी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाने फार मोठा फरक पडणार नाही. असे जरांगे पाटील म्हणाले.

Comments


bottom of page