ज्या मातेच्या कुशीतून आपण जन्म घेतो असेच वर्तन आपले असले पाहिजे डॉ. ज्योती मेटेंचा जरांगेवर निशाना

बीड : मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवालीत उपोषण सुरू आहे, मागण्यांवर ठाम जरांगे पाटील यांनी सरकारकडे 15 मागण्या ठेवल्या आहेत. पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सरकारमधील काही मंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत त्यांच्यावर निशाना साधला. जरांगे पाटील यांच्या भाषेवरून आता मत-मतांतरे समोर येत असतानाच शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांनी मनोज जरांगेंवर भाषेवरून निशाना साधला आहे.
शिवसंग्रामच्या अध्यक्षा व दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी बीडमध्ये बुधवारी (दि.9) पत्रकार परिषद घेतली. जरांगे पाटील यांच्या भाषेवरून त्यांनी खेद व्यक्त केला, डॉ. मेटे म्हणाल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील 15 मागण्यांच्या बाबत तपशिलाने विचार केला तर यातील बारा मागण्या पूर्ण झाल्याचे मला दिसते. या बरोबरच शासनाने चर्चेची सर्व दारे खुली ठेवली आहेत. आपण जेव्हा आंदोलनाचे नेतृत्व करतो तेव्हा त्या आंदोलनाची यशस्वी असेल अथवा अयशस्वी असेल जी काय असेल ती सांगता होणे गरजेचे असते. जरांगे पाटील यांनी प्रत्येक मागणीचा तपशिलाने विचार करावा आणि मगच काय निर्णय घ्यावा असे डॉ. ज्योती म्हणाल्या.
जरांगे पाटील यांच्या भाषेबाबत बोलताना डॉ. मेटे म्हणाल्या, गावगाडा चालला पाहिजे. जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे या मताची मी आहे. आम्ही जेव्हा नेतृत्व करतो तेव्हा आमच्यावर जबाबदारी असते. आमचे वर्तन जसे असेल तसंच अनुयायांचे देखील असते. ज्या मातेच्या कुशीतून आपण जन्म घेतो तिचे संस्कार सार्थ ठरतील असेच वर्तन आपलं असलं पाहिजे असं म्हणत डॉक्टर ज्योती मेटे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाना साधल.



Comments