top of page

ज्यांनी आयुष्यात एक पुलही बांधला नाही, ते आता... मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्र्यांनी विरोधाकांना सुनावले

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर सोमवारी पहाटे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर वाहतूक ठप्प झाली होती. मिसिंग लिंकवरील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. एकीकडे महामार्ग प्रशासनाकडून रस्ता पुन्हा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच, दुसरीकडे यावरून राजकारण मात्र चांगलेच तापले आहे.


सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंकच्या भागात पहिल्या बोगद्याच्या शेवटी डोंगरावरून मोठी दरड कोसळली. सततच्या पावसामुळे पाणी साचून डोंगर उतावरावरील माती आणि दगड खाली आले. ज्यामुळे तिथल्या रिटेनिंग वॉल कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून सोमवारी पहाटे दोन्ही महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे रोखण्यात आली होती.


या दुर्घनेनंतर विरोधकांनी राज्यातील महायुती सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.


“ अशा व्यक्तींना उत्तर द्यायला हवीत ज्यांना काही समजतं. ज्यांना फक्त आणि फक्त टीकाच करायची आहे. ज्यांनी स्वत:च्या आयुष्यात कधी काहीच केलं नाही, साधं एक पूलसुद्धा बांधला नाही आणि ज्यांच्या पक्षाने उभ्या महाराष्ट्राचा सत्यानाश केला, जे आता आम्हाला प्रश्न विचारत आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती आलेली नाही. जे झालं ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे झालं आहे” असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.


“ ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांनाच मनातून असं वाटतंय की यांच्या काळात काही का होत नाही. म्हणून ते बेछुट अशा प्रकारचे आरोप करत आहेत. अशा आरोपांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जर कही चूक झाली असेल तर ती ठीक केली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या पक्षाने 2013 साली 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं म्हणत त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती. पण महायुतीच्या सरकाने हिम्मत दाखवली आणि मिसिंग लिंक तयार केला.” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


मुंबई पुणे महामार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी सरासरी पेक्षा तीनपट जास्त आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे खाली आले. त्यामुळे अनेक छोटी वाहने अडकून पडली.100 टनांपेक्षा मातीचे ढिगारे तिथे आले जे आजपर्यऐत कधीही झाले नव्हते” असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments


bottom of page