ठाणे महापालिका आयुक्ताला लाच भोवली; पदावरून हटवलं, अधिकार गोठले
- Navnath Yewale
- Oct 3, 2025
- 1 min read

एका बांधकाम व्यवसायिकाकडून लाच घेतल्या प्रकरणी ठाणे महापालिकेचे उपआयुक्त शंकर पाटोळे यांच्यासह दोन जणांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागने अटक केली. या प्रकरणात पाटोळे यांनी तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडून 10 लाख रुपये घेतल्याचेही तपासात समोर आले होते. यानंतर आता लाचखोर अधिकारी शंकर पाटोळे यांच्यावर अतिक्रण उपायुक्त पदावरून हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांची अतिक्रमण उपायुक्त पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच नौपाडा कोपरी परिमंडळ 2 चे उपायुक्त पद देखील पाटोळे यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. तसेच पाटोळे यांच्या जागी अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचा पदभार उमेश बिरारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या वर्धापणदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे महापालिका मुख्यालयात संध्याकाळी उशिरा धाड टाकली होती. यावेळी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ठाणे महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना अटक केली होती. एका जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून 50 लाख रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी 25 लाख रुपयाचा पहिला हप्ता स्विकारताना शंकर पाटोळे आणि त्यांचा सहकारी ओमकार गायकर याला पथकाने रंगेहाथ पकडले होते.
या कारवाईनंतर हा तपास ठाणे लाचलुचपत विभागाकउे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबं विभागाच्या पथकाने आणखी एकाला आज शुक्रवारी अटक केली होती. सुशांत सुर्वे या आरोपीचे नाव होते. आता या प्रकरणी उपायुक्त शंकर पाटोळे, महापालिकेतील डेटा ऑपरेटर पदावर काम करणारा ओमकार गायकर आणि सुशांत सुर्वे या तिघांविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.



Comments