top of page

दादा नाहीत असलं विलिनीकरण काय कामाचं? एफआयआर घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद नाही, पोलिसांवर कोणाचा दबाव - रोहित पवार

बारामती : अजित पवार यांच्या बारामती विमानतळावरील विमान अपघाती मृत्यूला एक महिना पूर्ण होत आहे. डीजीसीएच्या कंपनीवरील कारवाई नंतर रोहित पवार यांनी सहकार्‍यांसमवेत बुधवारी (दि.25) मरिन ड्राईव्ह पोलिस ठाणे गाठत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिस प्रशासन एफआयआर घेत नसल्याचा आरोप करत त्यांनी आज गुरुवारी (दि.26) बारामती पोलिस ठाणे गाठले. मात्र,इथेही पोलिस प्रशासनकडून एफआयआर दाखल करुन घेण्यास पोलिस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह डीजीसीएवर गंभीर आरोप केले.


दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी मुंबई, दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत सादरीकरणाद्वारे गंभीर आरोप केले होते. राज्याचा उपमुख्यमंत्री आमच्या काकांसह पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. उभा महाराष्ट्र अजित दादांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येऊन त्यांना न्याया देण्याची मागणी करत असून आम्ही या घटनेच्या मुळाशी जाऊन खरा प्रकार जनतेसमोर आणणार असल्याचे रोहित पवार सातत्याने सांगत आहेत. त्यातच डीजीसीएने सबंधित व्हीएसआर कंपनींच्या जेट विमानांच्या उड्डाणांवर भारतात प्रतिबंध लागू करत कंपनीवर कारवाई केली आहे.


घटनेला महिना उलटला तरी अद्याप तपासामध्ये केवळ थातूर मातून कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत बुधवारी (दि. 25) रोहित पवार यांनी सहकार्‍यांसमवेत मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाणे गाठले. सबंधित व्हीएसआर कंपनीसह डीजीसीएवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी गेलेल्या रोहित पवार व पोलिस अधिकार्‍यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. प्रसंगी पोलिस अधिकार्‍यांनी एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.


मात्र, एका वरिष्ठ अधिकार्‍याची यावेळी एन्ट्री झाली आणि त्यास कोणाचा तरी फोन आला, त्यानंतर एफआयआर प्रक्रिया थांबवण्याच्या सूचना त्याने दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यानंतर बारामती पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याचा इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला होता. संशय व्यक्त करत


सबंधित कंपनी व डीजीसीएच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गुरूवारी रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी शेकडो समर्थक, बारामतीकरांसमवेत बारामती पोलिस ठाणे गाठले. दोन तास पोलिसांशी चर्चा केल्यानंतरही काहीच प्रगती झाली नाही. त्यानंतर रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी विमानातील त्रुटी व्हीएसआरचा कारभार यावर बोट ठेवत एफआयआर दाखल न करून घेतल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. याचदरम्यान एका पत्रकाराकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर रोहित पवार चांगलेच भडकल्याचे दिसून आले.


यावेळी रोहित पवार म्हणाले की, सर्वात आधी मीच म्हटलं होतं की विलिनीकरण करून आता काय फायदा नाही आणि आम्हाला आता करायचं नाही. पण पवार साहेबांचं वय पाहता, अजितदादांची ती (विलीनीकरण) भावनिक इच्छा होती. पवार साहेबांसोबत येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती.


अजित दादा 18 वर्षाचे होते, तेव्हा त्यांचे वडील वारले. अनंत अजोबा गेले, त्यानंतर (शरद) पवार साहेबांनी अजितदादांना मुलासारखं वागवलं. आणि हे अजितदादांच्या मनात होतं, ते त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. रेवतीचं लग्न ठरलंय, हे सांगण्यासाठी जेव्हा पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला, तेव्हा मी तिथे होतो. पण पवार साहेबांना कफ असल्याने त्यांना बोलता येत नव्हतं. साहेब काय बोलतात हे अजितदादांना कळत नव्हतं. त्यामुळे ही परिस्थिती पाहिल्यावर दादांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, मी ते पाहिलं आहे. अशी भावना अजित दादांची होती. मग असं असताना आम्ही राजकारण का करू? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला. अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादांना न्याय तरी द्या. एफआयआर तरी दाखल करा. साधा एफआयआर होत नसेल तर अजितदादांना न्याय कसा मिळणार, असं आमचं आणि लोकांचं मत आहे, हे बोलताना रोहित पवार अतिशय भावनाविवश झालेले दिसले.


विधानसभेला अजितदादांच्या विरोधात कोण उभं होतं? युगेंद्र, युगेंद्र आज इथं आहे ना. मला पहिलं जिल्हा परिषदेचं तिकीट दादांनी दिलं. मला आमदाराकीचं पहिलं तिकिट दादांनी दिलं. आणि राजकारणात आम्ही येण्यापूर्वी आम्ही लहानपणापासून आम्ही त्यांचे पुतणे आहोत. त्यांनी आम्हाला मांडीवर खेळवलं आहे. आम्ही त्यांच्यासाठी नाही लढायचं का? असा सवालही रोहित पवार यांनी केला. नायकवडी आणि मिटकरी आले, बाकीचे लोक आले नाहीत. ते मी काय सांगणार, त्यांच्या मनात असेल पण त्यांना येता येत नसेल असंही रोहित पवार म्हणाले.


अतिउत्साही कार्यकर्त्याला झापलं: पत्रकार परिषद संपल्यानंतर अतिउत्साही कार्यकर्त्यांने रोहित दादा तुम आगे बढो, एकच दादा रोहित दादा अशा घोषणा दिल्या, त्यावर रोहित पवार यांचा पाराच चढला, ए..ए.. येडा आहे का तू? चल निघ इथून असं म्हणत फक्त एकच दादा अजितदादा, बस्स असं त्यांनी जोरात सांगितलं, त्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी एकच दादा अजितदादा अशा घोषणा दिल्या.

Comments


bottom of page