दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती
- Navnath Yewale
- Aug 6
- 1 min read
नांदेडमध्ये दिव्यांगांचा जल्लोष; फटाक्यांची आतिषबाजी, पेढे भरुन आनंद

दिव्यांगांसाठी शासनस्तरावरून राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजनांचा दिव्यांगांना सहज लाभ मिळावा. दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी शासन निर्मीत दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी राज्यात सर्वश्रुत व पारदर्शक खमक्या अधिकारी म्हणून परिचीत असलेले आयएएस तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीने नांदेडमध्ये दिव्यांगांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरून आनंद साजरा केला.
महाराष्ट्रातील दिव्यांगाना एक जगण्याचं बळ मिळावं त्यांच्यापर्यंत राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना पोहोचाव्या व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या दिव्यांग कल्याण विभागावर गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने नुकतीच आय.ए.एस असलेले तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील दिव्यांगांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या वतीने नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आम्ही सारे तुकाराम मुंढे म्हणत सकल दिव्यांगांनी एकमेकांना पेढे भरून फटाके फोडून राज्य शासनाचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे.सय्यद आतिक हुसेन, आदित्य पाटील, परमेश्वर आकाडे, व्यंकट कदम,कार्तिक कुमार भरतिपुरम,शिवाजी सुर्यवंशी, बालाजी ढगे, शेख सादिक, प्रेमकुमार वैद्य, किरणकुमार न्यालापल्ली, राजु इराबत्तीन,शेख जहिर,नागेश निरडी,शेख माजिद, शेख आलीम, सुनिल कांबळे, शेख मतीन,मुंजाजी कावळे, सय्यद ताजोद्दीन, भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, मुकबधीर कर्णबधिर, हिमोफिलीया दिव्यांग यांच्यासह कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधनेसह शेकडो दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने या जल्लोषांमध्ये उपस्थित होते.
यावेळी सकल दिव्यांगांनी नवनियुक्त सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे की, नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी, दिव्यांग विशेष शाळेतील संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी पात्रता नसलेल्या नातलगांचीच नियुक्ती केली आहे.
परीणामी दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे अशा पात्रता नसणा-यांची चौकशी करून संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करावी.आमदार खासदार यांच्या कडील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव निधी खर्च करून घ्यावा, स्थानिक स्वराज्य संस्था कडील दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करून घ्यावा, महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ व रेल्वे मध्ये अंध, मुकबधीर-कर्णबधिर,हिमोफिलीया दिव्यांगांसाठी सुद्धा ४० टक्के दिव्यांग प्रमाणपत्रावर वनफोर्थ तिकिट उपलब्ध करून द्यावे, दिव्यांग व्यक्तींसाठीचे अधिनियम आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१६ सह आजवर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून दिव्यांगांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड कडून व्यक्त करण्यात आली आहे.



Comments