धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेनंतर आता राष्ट्रवादीचा तिसरा मंत्रीही अडचणीत; नरहरी झिरवाळांकडून थेट राजीनाम्याची तयारी
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत संशयित आरोपी म्हणून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच नावं आल्याने मुंडे यांना तर बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिसरे मंत्री नरहरी झिरवाळ आता मुंबई मंत्रालयातील त्यांच्या कक्षातील कर्मचार्याच्या लाचखोरीमुळे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकापाठोपाठ एक असे दोन तर आता तिसरे मंत्रीही अडचणी सापडले आहेत.
अधिवेशनाच्या तोंडावरच मंत्री झिरवाळ यांच्या दालनातील अधिकारी लाच घेताना सापडला आहे. प्रशासकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. याची जबाबदारीही झिरवाळ यांनी स्पष्ट केली आहे. यापूर्वी धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्याला लागला होता. आत झिरवाळ हे या प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, मुंडे, कोकाटे व झिरवाळ या तिघामंध्ये कोकाटे व झिरवाळ हे दोधे नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्याला दिवंगत नेते अजित पवार यांनी तीन मंत्रिपद दिली होती. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. त्यापैकी छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, व नरहरी झिरवाळ या तिघांना दादांनी कॅबिनेट मंत्री केलं. परंतु शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणात शिक्षा कायम ठेवण्यात आल्याने कोकाटे यांना अपल्या क्रीडामंत्रीपदाचा राजीनाम द्यावा लागला. आता राष्ट्रवादीचे भुजबळ व झिरवाळ हे दोन मंत्री जिल्ह्यात आहेत. त्यातले नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दुसरे मंत्री नरहरी झिरवाळ हे त्यांच्या कक्षातील कर्मचार्याच्या लाचखोरीमुळे संकटात सापडले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकत मोठी कारवाई केली. झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35 हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे मंत्रालयात कोणालाही दहा हजार रुपयांच्या वर रोकड घेवून जाण्यास पायबंद असताना लिपिक चक्क 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडला. लातूर मधील एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. तो पूर्ववत करण्याच्या बदल्यात लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी संबंधित दुकानदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागीतली. तडजोडीअंती 35 हजार रुपये स्वीकारताना त्याला एसीबीने पकडले. त्याच्यासोबत आणखी एकाला एसीबीने ताब्यात घेतलं आहे.
झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातच हा प्रकार घडल्याने या प्रकरणावरुन विरोधकांनी झिरवाळ यांना चारही बाजूंनी घेरलं आहे. विरोधकांनी या प्रकरणाशी अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांचा संबंध जोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच लाचेची ही रक्कम झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून घेतल्याचे ढेरंगे यांनी पोलिसांना सांगितल्याने झिरवाळ यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर एसीबीने नरहरी झिरवाळ यांचे कार्यालय देखील सील केले आहे.
नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी ते विधानसभेचे उपाध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर झिरवाळ अजित पवार यांच्यासोबत गेले होते. अजितदादांनी त्यांना मंत्रिपदही दिले. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आदिवासी चेहरा या लाचखोरी प्रकरणामुळे आता अडचणीत आला आहे.



Comments