देशाची लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे वाटचाल; डि. लिमिटेशन बीलासाठी भाजपचा खटाटोप, संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू- पृथ्वीराज चव्हाण
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 1 min read

सातारा: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बुधवारी (17 जून) दिल्लीपर्यंत पोहोचल्या.उद्धवसेनेचे सहा खासदार फुटणार, या वृत्तानेच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार ही चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात राजकारण सुरू असलेल्या खासदार फुटीच्या प्रकरणावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. हे सगळे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी सुरू असल्याचे ते म्हणाले.
कराड येथे माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले “ भाजप पक्ष फोडत आहे. उद्धवसेनेतील सहा खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र दिल्याने पक्षात फूट पडल्याची चर्चा आहे. केंद्र सरकार डी लिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ” असा आरोप त्यांनी केला.
“ महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात एकाच व्यक्तीची हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून, लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे” अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
“ लोट्स, टायगर, लायन ती काय मला जनावरांची नावे माहिती नाहीत, पण शिवसेना उद्धव ठाकरे गटात विभाजन झाल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. त्यामुळे पक्षात फूट पडलेली दिसत आहे” असे भाष्य माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले.
“ एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसर्या बाजूला ईडीची भीती, या दुहेरी कचाट्यात राजकारण करणे कठीण झाले आहे. तुम्ही पक्षात आलात, तर खोके मिळतील, कंत्राटे मिळतील आणि त्यातून चाळीस टक्के कमिशन खा, असे भ्रष्ट राजकारण सुरू आहे” भाजपला लोकसभा, राज्यसभेत संख्याबळ वाढवून डि लिमिटेशन बील आणायचं आहे. देशाची लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे, भाजपचा संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू सल्याचा खळबळजनक दावाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.



Comments