top of page

नायगाव मयुर अभयारण्यात वाघाचा वावर ! , वन विभागाच्या ट्रॅप कॅमेर्‍यात हालचालीची नोंद ; वन्यजीव अभ्यासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण घडामोड

5 hours ago
2 min read

बीड: जिल्ह्यातील नायगाव मयूर अभयारण्यात वाघाचा वारवर ट्रॅप कॅमेर्‍याने टिपला आहे. अभयारण्यातील खटकाळी पावणवठा क्रमांक 3 जवळ लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेर्‍यात वाघाची हालचाल नोंदवण्यात आली आहे. या नोंदीमुळे अभयारण्यातील वन्यजीवांच्या हालचाली, अधिवास आणि जैवविविधतेच्या अभ्यासाला महत्व प्राप्त झाले आहे.


वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्यसा हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी वन विभागाच्याव वतीने ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. विभागीय वन िधिकारी अमोल गरकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल घोडके, अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनरक्षक सोमनाथ शेळके, बद्रीनाथ परजणे यांच्या सहकार्याने नायगाव मयुर अभयारण्यातील खटकळी पाणवठा क्रमांक 3 जवळ हा कॅमेरा लावण्यात आला होता. या कॅमेर्‍यात वाघाचा वावर नोंदविण्यात आल्याची माहिती बीड जिल्याचे मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे यांनी दिली.


ट्रॅप कॅमेरे हे वन्यजीव संशोधन आणि संवर्धनासाठी प्रभावी साधन मानले जातात, जंगलातील पाणवठे, वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग आणि त्यांच्या हालचालींच्या सभाव्य ठिकाणी हे कॅमेरे लावून वन्यजीवांच्या उपस्थितीची नोंद घेतली जाते. या नोंदींच्या आधारे प्राण्यांच्या हालचालीचे स्वरूप, अधिवासाचा वापर आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करता येतो.

नायगाव मयूर अभयारण्यात वाघाची नोंद होणे ही वन्यजीव अभ्यासाच्या दृष्टीने लक्षवेधी बाब आहे. मात्र, वाघाच्या उपस्थितीचा कालावधी, त्याच्या हालचालींचे क्षेत्र आणि या परिसरातील त्याच्या वावराचे स्वरूप निश्चित करण्यासाठी अधिक निरीक्षण व शास्त्रीय अभ्यास आवश्यक आहे.


दरम्यान, या नोंदीच्या पार्श्वभूमिवर अभयारण्यातील वन्यजीवांच्या हालचालीचे सातत्याने निरीक्षण करणे, नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे आणि जैव विविधतेविषयी शास्त्रीय माहिती संकलित करणे महत्वाचे ठरते. वन विभागाच्या माध्यमातून ट्रॅप कॅमेर्‍यावंसारख्या अधुनिक साधनांचा वापर करून वन्यजीवांच्या उपस्थितीची नोंद घेणे संवर्धनाच्या प्रयत्नांना दिशा देऊ शकते.


अधिक निरिक्षण व अभ्यास आवश्यक: “ नायगाव मयूर अभयारण्य हे बीड जिल्ह्यातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाचे क्षेत्र आहे. या अभयारण्यात वाघाचा वावर नोंदविला जाणे ही वन्यजीव अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. मात्र, वाघाच्या उपस्थितीचा कालावधी, त्याच्या, हालचालींचे स्वरुप आणि तो या परिसरात नियमितपणे वावरतो की केवळ तात्पुरता आला आहे. याबाबत अधिक निरीक्षण व अभ्यास आवश्यक आहे ”

सिद्धार्थ सोनवणे

मानद वन्यजीव रक्षक बीड

Comments


bottom of page