पंढरपूरच्या विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य,वारकारी परिषदेचा आक्षेप धार्मिक क्षेत्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!
- Navnath Yewale
- 3 days ago
- 1 min read

पंढरपूर : पंढरपूरातील विठुरायाला चैत्र एकादशीच्या दिवशी अर्पण करण्यात आलेल्या पुरणपोळी नैवेद्यावरून नव्या वादाला तोंंड फुटले आहे. एकीकडे ही परंपरा असल्याचे मंदिर समितीचे म्हणणे असताना, वारकारी साहित्य परिषदेने या प्रथेवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे धार्मिक वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
चैत्र एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक उपवास करून विठुरायाचे दर्शन घेतात. या दिवशी विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्य दावण्यात आल्याने वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील महाराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, एकादशीच्या दिवशी उपवासाचे विशेष महत्व असते, अशा दिवशी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवणे म्हणजे एकादशी व्रताच्या तत्वांना विरोध करणारे आहे. “ देवाला अर्पण केला जाणारा नैवेद्य हा भक्तांच्या आचारसंहितेशी सुसंगत असावा, “ असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विठ्ठल पाटील महाराज यांनी मंदिर समितीकडे या प्रथेबाबत लेखी खुलासा करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते पोथ्या-पुराणातील संदर्भ देऊन अशा प्रकारचे कर्मकांड राबवणे योग्य नाही. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकातात.
दुसरीकडे विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. राजेंद्र शेळके म्हणाले की, चैत्र एकादशीला विठुरायाला पुरणपोळीचा अर्पण करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. या प्रथेनुसारच यंदाही नैवेद्य दाखवण्यात आला असून, यात कोणतीही नवीन गोष्ट नसल्याचं ते म्हणाले. धार्मिक श्रद्धा आणि परंपरा यामध्ये मतभेद निर्माण झाल्याने हे वाद पुढे आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Comments