top of page

पवारांनी जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं - हाके

परवानगी नसताना बारामतीत ओबीसींचा मोर्चा; ओबीसी नेते हाके यांची पवारांवर सडकून टीका


ree

बारामती: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर काढला. सरकारच्या जीआर विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक होताना दिसून येत आहे. मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षणाला विरोध व शासनाच्या जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी आज बारामती येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चास संबोधित करताना हाके यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.


बारामती हा नेहमीच पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतरही बारामतीकरांनी सावध पाऊल टाकत लोकसभेला थोरल्या पवारांना तर विधान सभेत धाकल्या पवारांना झुकते माप दिले. निर्विवाद पवारांचे नेतृत्व स्विकारणार्‍या बारामतीमध्ये आज दोन्ही पवारांवर ओबीसी नेत्यांकडून टीका करण्यात आली.


मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील उपोषणा दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीने जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर काढला. मराठवाड्यात ज्यांच्या कुळाची कुणबी नोंदी सापडेल त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद या जीआरमध्ये करण्यात आली आहे. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण नको, सरकारने काढलेला जीआर तत्काळ रद्द करावा अशी मागणी करत आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथे मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांकडून परवानगी नसताना हाके यांनी बारामती जाऊन मोर्चा काढला. शहरातील आहिल्यादेवी होळकर चौकातून मोर्चास सुरुवात करण्यात आली.


मोर्चास संबोधीत करताना हाके आक्रमक झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळताना शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना उभं केलं असून “ जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं आहे. असा हल्ला चढवला. हाकेंच मनोगज सुरू असतानाच वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. हाके यांनी ऑन स्पीकर फोन माईक जवळ घेवून प्रकाश आंबेडकर यांचा संवाद उपस्थितांशी ऐकवला. फोन कॉलद्वारे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “ जबरदस्ती दिलेलं आरक्षण आपल्याला मान्य नाही; त्याविरोधात रस्त्यावर उतरावं लागेल.”


पुढे बोलताना हाके म्हणाले की, मंडल अयोग देशभर लागू झाला होता, महराष्ट्रात नाही. त्याचं श्रेय पवारांना दिलं जातं, हे चुकीचं आहे. “ कोणी असं म्हटलं तर त्याचं कानफाड फोडा ” मंडल आयोग लागू करण्यासाठी दि.बा.पाटील, बनराव ढाकणे, शिवाजी भाऊ शेंडगे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, अरुण कांबळे, बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्वाची होती. शरद पवार हे कुटुंबाच्या बाहेर कारखाने, आमदारकी, खासदारकी जाऊ देत नाहीत. “ रयत शिक्षण संस्था, असो वा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, सर्वत्र शरद पवारांनीच अध्यक्षपद घेतलं.” इतकंच नाही तर महाराष्ट्रातील जवळपास 400 संस्थांचे अध्यक्ष शरद पवार असल्याची टीका त्यांनी केली.


अजित पवारांवरही हल्लाबोल.

हाके यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. “ कॅनलच्या कंपाऊंडवर गोधडी वाळत घातली तर बघा, कंपाऊंड तुझ्या बापाचं आहे का?” असा सावाल करत त्यांनी पवार कुटुंबीयांचा सत्तेतील दबदबा उघडकीस आणला. “ सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा कारखाना” असा आरोप करत, सामान्य कष्टकर्‍यांचे पैसे यामध्ये गुंतवले जातात. असा दावा हाके यांनी केला. पूर्वी ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होत होती. मात्र, आरक्षणाचा प्रश्न डळमळीत झाला तर “ आता ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी अशी लढत होणार आहे.” इतकंच नव्हे तर पुढील निवडणुकांमध्ये “ डुप्लीकेट ओबीसी विरुद्ध डुप्लीकेट ओबीसी” अशीच लढत होईल अशीही टीका हाके यांनी केली. यावेळी मंगेश ससाणे, नवनाथ वाघामारे यांनीही मनोगत व्यक्त करत ओबीसी आरक्षण धोक्यात आले असून आता रस्त्यावरच्या लढाई लढण्याचे आवाहन केले.

Comments


bottom of page