पालघर जिल्ह्यातील रेल्वे थांब्यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचा हिरवा कंदील
- Navnath Yewale
- Aug 12, 2025
- 1 min read
खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रयत्नांना यश; जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार

पालघर: जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि वाढवण बंदराच्या संभाव्य विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेल्या रेल्वेसेवांबाबत खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांच्याशी नुकतीच सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान सादर करण्यात आलेल्या निवेदनास रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, बांद्रा टर्मिनस ⇌ ओखा आणि बांद्रा टर्मिनस ⇌ सांगानेर या दोन विशेष गाड्यांना पालघर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाड्या ७ व १४ ऑगस्ट २०२५ रोजी धावणार आहेत.
तसेच, वेलंकन्नी उत्सव २०२५ निमित्ताने सुरू करण्यात येणाऱ्या बांद्रा टर्मिनस ⇌ वेलंकन्नी विशेष गाडीला वसई स्थानकावर थांबा निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालघर व वसई-विरार परिसरातील प्रवाशांना सणासुदीच्या काळात थेट व सुलभ रेल्वेसेवा मिळणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले की, “येत्या दोन वर्षांत पालघर जिल्ह्यातील आणखी काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर गाड्यांचे नियोजित थांबे निश्चित करण्यात येतील आणि प्रवाश्यांसाठी आवश्यक त्या सुविधा सुधारणेत सातत्य ठेवले जाईल.”
या सकारात्मक निर्णयाबद्दल खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले असून, पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.



Comments