पुणे हादरलं: धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार पुण्यात बोकाळणार्या गुन्हेगारील बळ मिळतंय कुठून?
- Navnath Yewale
- 11 hours ago
- 2 min read

पुणे: आयटी हब, शिक्षणाचं माहेरघर आणि ‘ सेफ सिटी’ अशी ओळख असलेल्या पुण्यात मध्यरात्री एका धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या आणि हायप्रोफाइल मानल्या जाणार्या कोरेगाव पार्क परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पीडित महिला आणि आरोपी यांची ओळख एका पार्टीदरम्यान झाली होती. पार्टी संपल्यानंतर आरेापीने “ घरी सोडतो” असा विश्वास देत महिलेला कारमध्ये बसवले. मात्र त्यानंतर मुंढवा- कोरेगाव पार्क मार्गावर धावत्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने धाडस दाखवत पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पुणे पोलिस यांच्या अंतर्गत येणार्या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हॉटेलमधील नोंदी, मोबाइल लोकेशन आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.
दरम्यान, तपास यंत्रणांनी दिलेल्या महितीनुसार संबंधित महिला आणि आरोपी एका प्रसिद्ध हॉटेलमधील पार्टीत सहभागी झाले होेते. पार्टीदरम्यान दोघांमध्ये ओळख झाली. त्यानंतर आरोपीने मैत्रीपूर्ण वर्तन करत महिलेला घरी सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र विश्वासाचा गैरफायदा धेत आरोपीने हा घृणास्पद प्रकार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शहरातील पब संस्कृती, रात्रीच्या पार्ट्या आणि त्यानंतरची सुरक्षा यावरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना अजून ताजी असतानाचा आता कोरेगाव पार्कमधील या प्रकरणामुळे संताप वाढला आहे.
विषेश म्हणजे, कोरेगाव पार्क हा परिसर रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे पब, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठी प्रसिद्ध आहे. अशा भागातच महिलेला सुरक्षित वाटत नसेल, तर सामान्य भागातील परिस्थिती काय असेल? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “ पुणे खरंच सुरक्षित आहे का? ” , “ महिलांनी रात्री बाहेर पडायचं तरी कसं?”,“ गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे का?” अशा तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही,रस्त्यांवरील कॅमेरे, टोल नाक्यावरील नोंदी आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. आरोपीची ओळख पटल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
दरम्यान, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पुणे पोलिसांवर दबाव वाढला असून, शहरातील रात्रीची सुरक्षा, गस्त आणि संवेदनशील भागांतील पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे.



Comments