top of page

पुण्यात भाजपच्या आंदोलनात राडा! भाजप- काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने; तुफान दगडफेक, पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह पत्रकार पोलिसही जखमी


पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कायकर्ते आक्रमक झाले, काँग्रेस भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


परिस्थिती चिघळताच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून काही पत्रकार आणि पेालिसांनाही दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत. रविवारी (दि.15) सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर सपकाळ यांच्या विधानाविरोधात सुमारे दिड तास आंदोलन केले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक दगडफेक झाली. यात एका महिला व एका पुरुष कार्यकर्त्याच्या डोक्याला मार लागून रक्तस्त्राव झाला. दोन्ही पक्षांच्या लोकांकडून दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. यात काही वाहनांचेदेखील नुकसान झाले.


दाम्यान, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी पांगविली भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने हल्ला केल्याचा आरोप करत काँग्रेसने फरासखाना पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केेले. या वेळी उपस्थित काँग्रेसच्य पदाधिकार्‍यांकडून महापौर मंजूषा नागपूरे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा,अशी मागणी केली.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमूानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध पर्वती पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.14) रात्री 11:30 च्या सुमारास गन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढा कॉलनी, सदाशिव पेठ) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून अक्षेपार्ह वक्तव्य केले. सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना करण्यात आली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल. सपकाळ यांचे वक्तव्य तेढ निर्माण करणारे आहे, असे घाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.


दरम्यान, रविवारी काँग्रेस कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनावेळी आमदार हेमंत रासने, महापौर मंजूषा नागपूरे, शहराध्यक्ष धीरज घाटे नगरसेविका निवेदिता एकबोटे, कल्पना बहिरट, नगरसेवक देवेंद्र वडके, राजेंद्र काकडे, विशाल धनवडे, बापू मानकर, कुणाल टिळक यांच्यासह भाजपयुवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तर काँग्रेसभवनात काँग्रेसचे महापालिकेचे गटनेते चंदू कदम, कोषाध्यक्ष अभय छाजेड, माजी मंत्री रमेश बावगे, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अक्षय जैन यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


“ मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, शहराच्या महापौर मंजूषा नागपूरे यांच्या उपस्थितीत दगडफेक झाली. त्यामुळे महापौरांसह भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हादाखल करण्यात यावा .

प्रशांत जगताप , काँग्रेस नेते



शहरात यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. या आंदोलनामुळे राजकारणातील मैत्रीपूर्ण संबंधदेखील दुरावले आहेत. यापूर्वी निवडणुकीतदेखील कोणत्याही प्रकारचे गालबोट लागले नव्हते. पण रविवारी झालेल्या आंदोलनामुळे शहरातील राजकीय परिस्थिती पूर्ण बदलली. याचे परिणाम राज्यभर होतील.

अक्षय जैन, प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस


आम्ही आंदोलनासाठी रीतसर परवानगी घेतली होती. आमच्या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी हे कटकारस्थान करण्यात आले. आमचे आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात तिथे जमले होते. आमच्याकडे असलेल्या व्हिडीओमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनामध्ये काठ्या जमा करताना दिसत आहेत. आम्ही याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली असून दगडफेकीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही केली आहे.

धीरज घाटे, शहराध्यक्ष , भाजप

bottom of page