पुण्यात शिंदेसेनेच्या बैठकीत राडा; शहरप्रमुख नाना भानगिरे रागात बाहेर पडले
- Navnath Yewale
- Dec 27, 2025
- 2 min read

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेसेनेला सोबत घेण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. मात्र शिंदेसेनेला जागा देण्याबद्दलच्या मुद्यावरून संघर्ष सुरू झाला आहे. शिंदेसेनेच्या नेत्या निलम गोर्हे यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी धरणे दिले होते. त्यानंतर आता शिंदेसेनेच्या दोन नेत्यांमध्येच बैठक सुरू असताना राडा झाला. यानंतर शिंदेसेनेचे पुणे शरप्रमुख नाना भानगिरे रागारागात निघून गेले. त्यामुळे शिंदेसेनेत जागांवरून खदखद असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला दूर ठेवले आहे, तर शिंदेसेनेला सोबत घेतले आहे. पण, जागावाटपाचा पेच सुटलेला नाही. शिंदेसेनेकडून 35 जागांची मागणी करण्यात आली आहे. तर भाजपाकडून 15 जागांचाच प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदेसेनेमध्ये अस्वस्था आहे.
दरम्यान, आज (शनिवार) शिंदेसेनेच्या नेत्यांची पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला विजय शिवतारे, निलम गोर्हे यांच्यासह पक्षाचे शहरातील प्रमुख नेते उपस्थित होते. याच बैठकीत शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये वाद झाला.
प्राप्त माहितीनुसार शिंदेसेनेच्या बैठकीत पक्षाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यात वादावादी झाली. त्यात भानगिरे यांना शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, बैठकीत मिळालेल्या वागणूकीनंतर नाना भानगिरे हे रागात हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांची समजूत घालण्यासाठी नीलम गोर्हे यांचे स्वीय सहाय्यक आले. मात्र, भानगिरे हे निघून गेले. नाना भानगिरे यांचा रागात निघून जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बैठकीला असलेल्या उसभापती निलम गोर्हे यांना याबद्दल माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर गोर्हे म्हणाल्या की, “ भानगिरे यांना एक कॉल आला होता. त्यांना एक निरोप आला होता. ते तुुम्हाला काय बोलले मला माहिती नाही, त्यांचा गैरसमज नक्की दूर केला जाईल.”
सध्या पुण्यात भाजपान शिंदेसेनेला 15 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. या प्रस्तावानंतर शिंदेसेनेत नाराजीची लाट आहे. काही पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी निलम गोर्हे यांच्या घरासमोर शुक्रवारी धरणे दिले. भाजपच्या सांगण्यानुसार शिवसेना चालणार का? असा सवाल पदाधिकार्यांनी पक्षाच्या नेत्यांना केला. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघेल अशी अशा होती. पण, त्यात नवाच वाद उफाळून आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकदुखी वाढली आहे. अशी चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली आहे.



Comments