फरार कृष्णा आंधळे गँगची दहशत, मैद ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीला
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या टोळीकडून गावात व परिसरात पुन्हा दहशत निर्माण केली जात आहे. या गुन्हेगारी गँगच्या दहशतीने भयभीत झालेल्या मैद ग्रामस्थांनी शनिवारी (दि.23) पोलिस अधीक्षकांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. फरार कृष्णा आंधळे अनेकदा गावात येऊन गेल्याचा खुलासा करत त्याच्या गँगच्या दहशतीने त्रस्त मैद (ता. धारुर) ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेवून कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, फरार कृष्णा आंधळे अनेकदा गावात येऊन गेल्याचा दावा दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी अनेकवेळा केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर कृष्णा आंधळे अद्यापर्यंत तपास यंत्रणेला हुलकावण्या देत आहे. कृष्णा आंधळे, जयराम चाटे यांची गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे. या टोळीची मोठी दहशत असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गुन्हेगारी टोळीकडून सामन्यांना मारहाण करणे, खोटे गुन्हे दाखल करणे, जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणे अशा विविध प्रकारचे खुलेआम कृत्य करण्यात येत असल्याचा अरोपही मैदा ग्रामस्थांनी केला.
फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करण्यात यावी, या गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी,गावात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यात यावे अशी मागणीही मैदा ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.



Comments