बीड जिल्ह्यासाठी सिद्धार्थ सोनवणे यांची ‘मानद वन्यजीव रक्षक’ पदी नियुक्ती, वन्यजीव संरक्षण व संवर्धन क्षेत्रात जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब

बीड : वन्यजीव संवर्धन क्षेत्रात बीड जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी घडामोड घडली असून, सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक श्री. सिद्धार्थ धोंडीराम सोनवणे यांची महाराष्ट्र शासनाने मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. 13 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णय क्र. डब्ल्यूएलपी-03.26/प्र.क्र.83/फ-1 नुसार राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बीड जिल्ह्यासाठी अ.क्र. 17 वर श्री. सोनवणे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
सदर नियुक्ती ही संबंधित दिनांकापासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू असून, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 मधील कलम 4(1)(बी) अंतर्गत करण्यात आली आहे. मानद वन्यजीव रक्षक म्हणून श्री. सोनवणे यांच्यावर वन्यजीव संरक्षण व संवर्धन, जखमी व अडकलेल्या वन्यजीवांची सुटका व उपचारासाठी मदत, बेकायदेशीर शिकार व वन्यजीव तस्करी रोखणे, जनजागृती करणे तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कार्य करणे अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यासोबतच वन विभागास आवश्यक ते सहकार्य करणेही त्यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट आहे.
श्री. सिद्धार्थ सोनवणे हे गेल्या सुमारे 26 वर्षांपासून सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून निसर्गातील जखमी, आजारी व आईपासून दुरावलेल्या वन्यजीवांची सेवा व पुनर्वसन कार्य सातत्याने करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 20,000 हून अधिक वन्यजीवांवर उपचार करून त्यांना नवजीवन दिले आहे. त्यांच्या कार्यात मोर, घुबड, गरुड, गिधाड यांसारखे विविध पक्षी तसेच लांडगा, तरस, बिबट, काळवीट, खवले मांजर यांसारख्या प्राण्यांचा समावेश असून, सामान्य ते दुर्मिळ व संकटग्रस्त प्रजातींच्या संवर्धनासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
बालवयापासूनच वन्यजीवांविषयी असलेले प्रेम, संवेदनशीलता आणि निस्वार्थी सेवाभाव यामुळे श्री. सोनवणे यांचे कार्य विशेष ठरले असून, त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत शासनाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीमुळे त्यांना वन विभागासोबत अधिकृत समन्वय साधून कार्य करण्याची संधी मिळणार असून, बीड जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण चळवळीला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कर्मचारी तसेच जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, सामाजिक संस्था आणि वन्यजीव कार्यकर्त्यांकडून श्री. सोनवणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Comments