बीड-पुणे रेल्वे शुभारंभ कार्यक्रमास मुंडे बंधू-भगिणींची दांडी!; चर्चांना उधान

बीड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड- हडपसर (पुणे) या नवीन रेल्वे सेवेचा बीड स्थानकावरून थाटात शुभारंभ करण्यात आला . राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेता पवार यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मात्र, या अत्यंत महत्वकांक्षी आणि बहुप्रतिक्षित प्रकल्पाच्या उद्घाटनाला जिल्ह्याचे प्रमुख नेते मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे या दोघांचीही अनुपस्थिती राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
बीडच्या रेल्वे स्वप्नासाठी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी मोठा संघर्ष आणि सातत्याने पाठपुरावा केला होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी स्व. मुंडे साहेबांच्या या योगदानाचा विशेष उल्लेखही केला. खुद्द पालकमंत्री सुनेत्रा पवार जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले असताना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. दोघांच्याही गैरहजेरीमागील अधिकृत कारण अद्याप समोर आले नसले तरी महायुतीतील अंतर्गत समीकरणांमुळे ही उपस्थिती होती की अन्य काही कारणांमुळे याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
एकीकडे प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती चर्चेत असताना दुसरीकडे या ऐतिहासिक सोहळ्याला स्थानिक नागरिकांचाही अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रशासनाच्या वतीने या सोहळ्यासाठी भव्य असा सभा मंडप उभारण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की, पुढच्या वर्षी बीडवरून थेट पुणे रेल्वे सुरू करू, असा शब्द अजितदादांनी बीडकरांना दिला होता. आज तो शब्द पूर्ण झाला आहे. या रेल्वेमुळे बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला मोठी चालना मिळेल. या कार्यक्रमाला खासदार बजरंग सोनवणे आमदार अमरसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींसह व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



Comments