top of page

भटक्यांच्या पंढरीत मुस्लिम दुकानदारांना पुन्हा विरोध मढी ग्रामपंचायतीचा ठराव; हिंदू- मुस्लिम वाद कोर्टात पोहचला, न्यायालयाकडून ठरावाला स्थगिती

आहिल्यानगर, दि. 24: मढी (ता. पाथर्डी) श्री क्षेत्र कानिफनाथ संस्थानची यात्रा रंगपंचमीला भरते. भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या या देवस्थान स्थळी जात-पात, धर्म-पंथा च्या सर्व भिंती गळून पडतात. असे असताना गेल्या दोन वर्षापासून येथील यात्रेला हिंदू-मुस्लिम भेदभावाचं गालबोट लागताना दिसत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मढी ग्रामपंचायतीने तसा ठराव घेतला आहे. सरपंच संजय मरकड यांनी ठाराव जाहिल केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.


राज्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्याव जाणार्‍या आहिल्यानगर श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ यात्रेवरुन पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावू देणार नाही, या आपल्या जून्या भूमिकेवर मढी ग्रामपंचायत पुन्हा आक्रमक झाली आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी देखील ही भूमिका अधिकृतपणे जाहीर केली आहे.


ग्रामपंचायतीच्या या ठरावामुळे यात्रेपूर्वीच आहिल्यानगर जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरवर्षी रंगपंचमीच्या मुहूर्तावर मढी येथे मोठी यात्रा भरते. परंतु गेल्या वर्षापासून या यात्रेला धार्मिक भेदभावाच्या वादाचे ग्रहण लागलं आहे. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास मज्जाव करणारा ठराव मंजूर केला होता.


ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे राज्यभरात मोठा गदारोळ झाला होता, आता प्रकरण अखेर न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले. न्यायालयाने अद्याप कोणताही अंतिम निकाल दिला नसला तरी, ग्रामपंचायतीच्या ठरावाला तुर्तास स्थगिती दिली आहे. मात्र ग्रामपंचायतीने तोच पवित्रा घेतल्याने आहिल्यानगरच्या प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.


दरम्यान श्री चैतन्य कानिफनाथ यात्रेसाठी राज्यासह देशभरातून भाविक येतात. यातच पुन्हा एकदा धार्मिक भेदभावाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी ग्रामपंचायतीने पुन्हा घेतलेल्या ठरावावर भूमिका मांडली आहे . ग्रामपंचायतीने घेतलेला ठरावावर आम्ही ठाम आहोत. यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली जणार नाही.


प्रशासनाने कारवाई करावी: सरंपच संजय मरकड यांच्या या भूमिकवर आणि ग्रामपंचायतीच्या ठरावार सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. हा निर्णय म्हणजे, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील बिघडलेल्या धार्मिक सलोख्याला आणखी चिथावणी देण्यासारखं आहे. प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या या ठरावावर थेट कारवाई करावी अशा भावना व्यक्त होत आहेत.


मुस्लिम व्यवसायिकांना विरोध का? : या यात्रेत भटक्या विमुक्त समाजाच्या वेगवेगळ्या प्रथा- परंपरा पहायला मिळतात. काळ बदलत चालल्याने या प्रथा कमी होत चालल्या आहेत. गाढवांचा बाजार या यात्रेत आजही पहायाला मिळतो. यात्रे दरम्यान ग्रामस्थ प्रथा -परंपरेनुसार गादीवर न बसणे, मांसाहार न करणे आदी नियम, पथ्य पाळतात. मात्र, यात्रेदरम्यान मुस्लिम व्यवसायिक यातल्या कुठल्याही प्रथा-परंपरेचे पालन करत नाहीत. अवैध व्यवसाय करतात. यातून तंटे निर्माण होतात. त्यामुळे ग्रामपंचायत मुस्लिम व्यवसायिकांना विरोध करत असल्याचे सरपंच मरकड म्हणाले.


न्यायालयाकडून ग्रामपंचातीच्या ठरावाला स्थगिती : गेल्या वर्षी झालेल्या या ठरावाविरोधात मुस्लिम व्यवसायिकांनी औरंगाबाद खंडपीठात धव घेतली होती. या ठरावाला न्यायालयाने स्थागिती दिल्याचा दावा मुस्लिम व्यवसायिकांनी केला आहे. पण हा मुद्दा यंदाच्या यात्रेत तोंडावर पुन्हा तापवला जात आहे. यावर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी मुस्लिम व्यवसायिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यासाठी औरंगाबाद खंडपीठाने ठरावाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाची प्रत देखील दिली आहे. जिल्हा प्रशासन यावर आता काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page