top of page

भाजप हा उपर्‍यांचा आणि दलालांचा पक्ष, नाशिकमध्ये ठाकरे बंधू कडाडले


नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची पहिली संयुक्त सभा पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली. “ 1952 साली जन्मलेल्या पक्षाला आज पोरं भाड्याने घ्यावी लागत आहेत” अशा शब्दांत राज ठाकरेंनी भाजपच्या सद्यस्थितीवर हल्लाबोल केला, तर “ उद्या हे रावणालाही पक्षात प्रवेश देतील” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.


महापालिका निवडणुक प्रचारार्थ आयोजीत सभेस संबोधीत करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील सत्ताकाळातील कामांची उजळणी केली. बॉटनिकल गार्डन, शस्त्रास्त्र संग्रहालय आणि शहरातील पाणीप्रश्न सोडवल्याचा उल्लेख करत त्यांनी सध्याच्या दुरावस्थेवर बोट ठेवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “ फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती, पण दत्तक घेतल्यानंतर हा माणूस इकडे फिरकलाच नाही. मेट्रो, आयटी पार्क आणि रिंग रोडच्या घोषणा हवेतच विरल्या”


राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पद्धतीवरही संताप व्यक्त केला. “ 60 -70 उमेदवार बिनविरोध निवडून आणले जात आहेत. म्हणजे लोकांचा मतदानाचा अधिकारच तुम्ही हिरावून घेणार का? ज्यांनी आयुष्यभर पक्षात काम केले त्यांना शून्य किंमत उरली असून बाहेरून पोरं भाड्याने आणून निवडणुका लढवल्या जात आहेत. अशी टीका त्यांनी केली.


उद्धव ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व ‘चुनावी’ असल्याचे म्हणत त्यांनी भाषणाची सुरूवात ‘ माझा भाऊ माझ्या सोबत आहे’ असे म्हणत केली. भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, “ भाजपचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित आहे. ज्यांनी प्रभू रामाला वनवासात मदत केली, त्या तपोवनातील झाडांची कत्तल हे सरकार करत आहे. भ्रष्टाचार इतुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, अशी यांची नीती आहे.”


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “ सलीम कुत्ता चालतो, पण आम्ही एकत्र आलेलो यांना चालत नाही. भाजप आता उपर्‍यांचा आणि दलालांचा पक्ष झाला आहे. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने जे लोक पक्षात येत आहेत, त्यांना पाहून वाटते की उद्या हे रावणालाही पक्षात प्रवेश देतील.”


सत्ता परिवर्तनाचे आवाहन: दोन्ही नेत्यांनी नाशिकरांना आवाहन केले की, महाराष्ट्रातील शहरांची अवस्था सुधारण्यासाठी आणि मुलांचे भवितव्य वाचण्यासाठी या निवडणुकीत बदल घडवणे आवश्यक आहे “ तुम्ही आमच्या हातात सत्ता देऊन बघा, आम्ही पुन्हा नाशिकला गतवैभव मिळवून देऊ,” अशी ग्वाही राज ठाकरे यांनी दिली. या सभेमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून ठाकरे बंधूंच्या युतीने सत्ताधारी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

Comments


bottom of page