भोंदू खरातसोबत व्हिडिओमधील महिलेची चौकशी करताच चाकणकरांचा हस्तक्षेप ,पोलिसांनाच धमकावल्याचं समोर ; चाकणकरांभोवती आवळणार एसआयटी चौकशीचा फास
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर आल्याने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. तर भोंदूबाबाशी जवळीक असल्यामुळे आणि त्याला गुरू मानल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
शिवाय अशोक खरात प्रकरणात चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे अशोक खरातचे काळे कारनामे समोर येण्याआधीच त्याच्या सर्व प्रकरणांची माहिती रुपाली चाकणकरांना होती. मात्र, त्यांनी ही माहिती बाहेर काढण्याऐवजी ते बाहेर आणू इच्छिणार्या पोलिसांवरच दबाव आणल्याचं समोर आलं आहे.
.
मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीतील एका प्रकरणात पीडितेचा जबाब घेण्यावरुन चाकणकरांनी पोलिसांवर दबाव आणल्याचं समोर आलं आहे. चाकणकरांचा हस्तक्षेप संशयास्पद वाटल्यामुळे नगर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती थेट पोलीस महासंचालकांना दिली आणि त्यानंतर खरातवर पाळत ठेवली गेली आणि त्यानंतर त्याच्या काळ्या कारनाम्याचा भांडाफोड झाला.
दरम्यान, सध्या बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ नितीन जाधव व्हायरल करत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी अशी तक्रार शिर्डीतील एका पीडितेने पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या पीडितेला जाबाबासाठी बोलावले. यावेळी चौकशी दरम्यान पोलिसांनी तिला खरातशी असलेल्या संबंधाविषयी प्रश्न विचारले असता ही महिला चिडली व तिने चाकणकरांना या सर्व प्रकरणाची माहिती दिली.
त्यानंतर चाकरणकरांनी पोलिसांना अनावश्यक प्रश्न का विचारता म्हणून पोलिसांनाच फैलावर घेतले. त्यावर पोलिसांनी व्हिडिओ खरे आहेत की खोटे हे सिद्ध करण्यासाठी प्रश्न आवश्यक असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांनी पोलिसांवरच कारवाई करण्याची धमकी दिली आणि पीडितेने थेट राज्य महिला अयोगाकडे लेखी तक्रार केली.
तर ही तक्रार चाकणकरांनीच करायला लावल्याचा संशय तपास अधिकार्यांना आहे. शिवाय या तक्रारीच्या आधारावर शिर्डी पोलिसांविरुद्ध कारवाई करू, अशी धमकीही चाकरणरांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना दिल्या शिवाय राज्य महिला अयोगाने महिलेच्या तक्रारीवरून 9 मार्च रोजी शिर्डी पोलीस ठाण्याला नोटीस देखील पाठविली होती.
त्यामुळे या प्रकरणी संशय बळावलेल्या पोलिसांनी नाशिकला जाऊन खरातची माहिती गोळा केली. शिवाय या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येताच नगर पोलिस दलाने थेट राज्याच्यसा पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली. त्यानंतर महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांना ही महिती दिल्यावर पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि खरातला बेड्या ठोकल्या.
मात्र, या सर्व आरोपांवर अद्याप रुपाली चाकणकर यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण खरातचे कारनामे समोर येण्याआधीच चाकणकरांना सर्व प्रकरणाची माहिती होती. तरी त्यांनी त्याचा भांडाफोड का केला नाही, शिवाय मदत होईल अशी भूमिका का घेतली? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.
चाकणकरभोवती एसआयटीच्या चौकशीचा फास! : भोंदू अशोक खरात प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास सुरू आहे. आयपीएस अश्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत खरातचे अनेक काळे कारणामे समोर येत असून त्याने जमवलेल्या मायेची आता आयकर विभागाकडून तपासणी सुरू आहे. ज्यामध्ये अंदाजे 2000 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे. एसआयटी आता शिवनिका ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी करणार आहे. महिला अयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर या त्या ट्रस्टच्या संचालिका पदावर होत्या त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या भोवती एसआयटी चौकशीचा फास आवळणार हे निश्चित मानले जात आहे.



Comments