भोंदूबाबा खरात प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी
- Navnath Yewale
- Mar 25
- 2 min read

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घोषणा केली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळमिसळ होता कामा नये, आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिले नाही, असे स्पष्ट करताना अशोक खरातप्रकरणी कडक कारवाई केली जाईल व याप्रकरणातील दोषीला सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. या संबंधित गुन्ह्यात 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे, त्यामुळे 60 दिवसांच्या आत अरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिलांच्या संदर्भात गुन्हे आहेत ते 60 दिसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करत आहेत. वकिलांना दोनपेक्षा जास्त अॅडजोनमेंट मागता येणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
विधीमंडळात बोलताना भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेवर फडणवीसांनी जोरदार प्रहार केला . यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची भेळमिसळ होता कामा नये, आपल्या संतांनी देखील भोंदूगिरीला स्थान दिलं नाही, मात्र त्यांनी देवाचं अस्तित्वही नाकारलं नाही.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भोेंदूबाबा खरात संदर्भात निवेदन केले आहे, तसेच याप्रकरणी ज्यांच्याकडे माहिती आली असेल त्याची माहिती शासनाकडे द्यावी. या प्रकरणाने आपण कुठे जातो याचा विचार करण्याची गरज आली आहे. आपण श्रद्धा मानणारे आहोत मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. अंधश्रद्धा पाळली की कसा विवेक हरवतो हे उदाहरण आहे. सर्वच संतांनी देवाचं अस्तित्व स्वीकारलं आहे, नाकारलं नाही मात्र यांनी अधंश्रद्धेवर प्रहार केला आहे.
जादुटोणा संदर्भात नियम अंतिम टप्प्यात आहेत. या कायद्याची अंमलबजावणी आपण केली आहे, जादूटोणा करून समस्या संपल्या असत्या तर डोनाल्ड ट्रम्पचा सल्लागार म्हणून त्यालाच नेमला असता, असेही मुख्यमंत्री उपरोधात्मक म्हणाले.
हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते, युद्ध ड्रोनऐवजी लिंबू मिरचींन लढलो असतो. पाकिस्तानच्या दहशतवादाला येथे बसून टाचण्यांंनी संपवून टाकलं असतं, आणि सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता पडली नसती. पाच दहा भोंदू बाबा पाठवले असते आणि आपली सीमा अगदी त्या ठिकाणी नीट झाली असती, असे सांगत भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेवर फडणवीसांनी जोरदार प्रहार केला.



Comments