top of page

मंत्री गिरीश महाजनांच्या आडचणी वाढल्या? अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा माधवी जाधव यांना फोन


नाशिक: प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमामुळे मंत्री गिरीश महाजन चांगलेच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. प्रजास्ताक दिन असताना त्यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक माधवी जाधव या महिला कर्मचार्‍याने आक्षेप घेतला आहे. आंबेडकर हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा करत माधवी जाधव यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच माझी नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेब आंबेडकर हे नराव संपू देणार नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. यासंपूर्ण घटनेचा व्हिडाओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सगळीकडे संताप व्यक्त केला जात असताना गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतुु आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे.


दरम्यान, नाशिकमधील माधवी जाधव यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यांनी माधवी जाधव यांना थेट कॉल केला आहे. माधवी जाधव यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले आहे. तसेच महाजन यांच्या कथित कृत्याचा निषेध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पक्षाच्या भूमिकेबाबत सविस्तर सांगितलं आहे. आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणार्‍या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधव जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


गुन्हा नोंदवण्यास भाग पाडणार: मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वत: या संदर्भातील कायदेशीर ड्राप्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल, असा इशाराही त्यांनी दिला. आरएसएस- भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे म्हणत त्यांनी महाजन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


मी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली:

वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत खुलासा केला आहे. गिरीश महाजन म्हणाले की, मी संघाच्या मुशित वाढलेला आहे ते मला माहीत आहे काय काय ते, आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा माणुस मी आहे. आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे, एकही पुतळा नव्हता. गेल्या वर्षी मी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुताळ दोन तीन जिल्ह्यात नाही, एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा आम्ही त्याठिकाणी उभा केला. त्यांचं स्मारक उभा केलं. लोकं किती आनंदीत आहेत. अशी एकही मिरवणूक नसेल की त्यामध्ये मी नसेल, तुम्ही विचारा.


पण आता अनावधानानं एखादं नाव घ्यायचं राहून गेलं, म्हणून मला वाटतं त्याच्या बद्दल एवढा गोंधळ कशासाठी? हा फार काही जानिवपूर्वक मी अर्वाच्च बोललो, उलटं सूलटं बोललो. पण नावं राहीलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं.. मला काही समजलं नाही, हा विषय तर कसा आला कशामुळे आला, असं नाहीयं. प्रजासत्ताक दिन होता ठीक आहे मी म्हटलं भारत माता की जय, वंदेमातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय . बाबासाहेबांचं नावं माझ्याकडून अनावधानानं राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली, म्हटलं नाही त्या भगिणीच्या भावना दुखावल्या असतील मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यासाठी थेट अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा वगैरे हे काही योग्य नाही असही गिरीश महाजन म्हणाले.

Comments


bottom of page