मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरची पार्किंगमध्ये लँडिंग सुदैवाने हानी टळली; लँड करताना पायलटची मोठी चूक
- Navnath Yewale
- 22 hours ago
- 1 min read

पुणे: जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.11) समोर आली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे महात्मा फुले जयंतिनिमीत्त आयोजित कार्यक्रमासाठी येथे येत होते. मात्र, नियोजीत हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती, तरीदेखील खानवडी गावात पोहोचलेल्या हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने तिथेच लँडिंग केले. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाही. पोलिसांनी तातडीने पायलटला योग्य माहिती दिल्यानंतर हेलिकॉप्टर तिथुन हलवण्यात आले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. योग्य नियोजन असतानाही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणे अत्यंत धोकादाय असल्याचे त्यांनी सांगितल. विशेषत: लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकली असती, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.
प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. हेलिपॅड स्पष्ट दिसत होते का, पायलटकडून नेमकी चूक कशी झाली किंवा काही तांत्रिक अडचण होती का, याचा तपास केला जाणार आहे. या घटनेनंतरही मंत्री छगन भुजबळ सुरक्षित असून त्यांनी आपला पुढील कार्यक्रम नियोजनानुसार पूर्ण केला. मात्र, या प्रकारामुळे सुरक्षा आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भाविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



Comments