top of page

मंत्री विखे पाटलांची वेळ देऊनही आंदोलनाकडे पाठ?; क्रांती मार्चाचा संताप

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण मागणीसाठी (दि. 9, ऑगस्ट) पासून मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र दाते पाटील यांचे विभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. प्रकृती खालावलेली असताना मागण्यांवर ठाम आंदोलनकर्ते दाते पाटील यांच्या आंदोलनास भेट देण्याची वेळ देऊनही मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत क्रांती मोर्चाच्या सेवकांनी निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.


मराठा आरक्षण मागण्यांसाठी क्रांती मोर्चाचे राजेंद्र दाते पाटील बुधवार दि.9 ऑगस्टपासून विभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले आहेत. प्रकृती खालवली असतानाही मागण्यावर ठाम दाते पाटील यांच्या आंदोलनास भेट देण्याची वेळ मराठा उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री विखे पाटील यांनी दिली होती. मंत्री विखे पाटील गुरूवारी (दि.20) छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर आहेत. मंत्री विखे पाटील यांच्या स्वीय्य साह्यकाने सायंकाळी 5:00 वाजताच्या दरम्यान आंदोलनास्थळास भेट देण्याचं भ्रमणध्वनीवरून सांगितले होते.


मात्र मंत्री विखे पाटील आंदोलनस्थळापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरील सुभेदारी विश्रामगृह येथे आले मात्र त्यांनी राजेंद्र दाते यांच्या आंदोलनस्थळी भेट देण्याचे टाळून कार्यकर्त्याच्या घरी गेले. त्यानंतर रात्री नियोजीत दौर्‍याच्या दिशेने निघून गेल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. आंदोलनस्थळाकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत क्रांती मोर्चाच्या सेवकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोटे परिपत्रक काढून समाजाला फसवलं आहे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळत नाहीत, नोंदीनुसार मिळालेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी होत नाही, ओबीसीच्या धर्तीवर एसईबीसी च्या लाभार्थ्यांना सवलती मिळत नाहीत या मागण्यांबाबत आम्हाला त्यांच्याकडून अश्वासनाची अपेक्षा होती मात्र त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवून पळ काढल्याचा घणाघात क्रांती मोर्चाच्या सेवकांनी केला. मंत्री विखे पाटलांवर संताप व्यक्त करत आंदोलकांनी त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. उपोषणकर्ते राजेंद्र दाते पाटलांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा क्रांतीमोर्चाच्या वतिने यावेळी देण्यात आला.

Comments


bottom of page