मराठा आंदोलक जरांगे पाटलांचा चलो दिल्ली चा नारा!
- Navnath Yewale
- Sep 20
- 1 min read

मराठा समाजातील नेते, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी चलो दिल्ली चा नारा देत राज्यातील मराठा मराठा समाजाला अवाहन केले आहे. देशभरातील मराठा समाजाचे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अधिवेशन होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या अधिवेशनाची तारीख लवकरच जाहिर केली जाणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट यांची अंमलबजावणी झाल्यानंतर हे अधिवेशन होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली. हैदराबाद गॅझेट संदर्भातील या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्ली अशी घोषणा केली. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट यांची सरकारद्वारे अंमलबजावणी झाल्यानंतर देशाच्या राजधानीत मराठा समाजाचे अधिवेशन भरवले जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
धाराशिवमधील बैठकीत मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या दसरा मेळाव्याबाबतही माहिती दिली. यंदाचा मराठा समाजाचा दसरा मेळावा साधेपणाने होणार आहे. बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मराठा समाजाचा दसरा मेळावा होणार आहे. आंदोलनात वेळ गेल्याने तयारीला फक्त वीस दिवसच मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून समाजाने एकजूट दाखवायला पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई या मोर्चाचे नेतृत्व केले होते. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव जमले होते. आझाद मैदानावर त्यांनी मराठा आरक्षणासह अन्य इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण केले. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील नारायगडावर दसरा मेळाव्यासाठी साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. दसरा मेळावा साध्या पद्धतीने होईल असे जरांगे पाटील यांनी संकेत दिले असले तरी दसरा मेळाव्यासाठी सफाईचे काम गुरुवार पासूनच सुरू करण्यात आले आहे. परिसरताी गावखेड्यांतीन नागरिक गडावर सफाईकामासाठी श्रमदान करत आहेत.



Comments