top of page

मराठ्यांच्या लेकरांनी शासक, प्रशासक बनावे - जरांगे पाटील

श्री क्षेत्र नारायण गडावर दसरामेळाव्यातून जरांगे पाटलांची फितूरांसह मुंडे बंधू भगीणींवर सडकून टीका.

ree

बीडमधील श्री क्षेत्र नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांनी मठाधिपती शिवाजी बाबा महाराज, ह.भ.प. मेंगडे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा मेळाव्यास संबोधीत केले. जरांगे पाटील यांची दसरा मेळाव्या पूर्वीच काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू आहेत. दसरा मेळाव्यास जरांगे पाटील उपस्थितीत राहणार का? ही उत्सुकता होती. मात्र, परंपरा खंडीत होऊ देणार नाही असा निश्चिय करत जरांगे पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत नारायणगडावर जाणार असल्याचे जाहिर केले.


सकाळी गॅलेक्सी हॉस्पीटलमधून अ‍ॅब्यूलन्समधून जरांगे पाटील नारायणगडावर पोहोचले. श्री क्षेत्र नगदनारायण गडावर नगदनारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतांना जरांगे पाटील यांच्या डोळ्यांत अश्रू होते. मठाधिपती शिवाजी बाबा महाराज, ह.भ.प. मेंगडे महाराज, जरांगे पाटील यांनी शस्त्र पूजन केले. व्यासपीठावर जरांगे पाटील यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी भेट घेतली पिता- पुत्रांच्या या भेटीच्या भावूक क्षणाने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पान्हावल्या. बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षिरसागर यांच्यासह पदाकिधार्‍यांनी नागरिकांमध्ये सहभागी होवून दसरा मेळाव्यात सहभाग घेतला.


छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना वंदन करून जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. प्रकृती खालावलेली असल्यामुळे जरांगे पाटील यांनी व्यासपीठावर खुर्चीवर बसून सभेला प्रारंभ केला. “ विराट संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आज खासदारांपासून आमदारापर्यंत सर्व जणांनी या पवित्र नारायण गडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मला बोलायला खूप त्रास होत आहे. आपला गड नगद आहे म्हणून मला ताकद मिळतेय. मला ताकद मिळाली तशी माझ्या शेतकर्‍यांना मिळावी”


“ खूप वेदना आहे, शरिराला त्रास होत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असली तर बघा एक पाच, सहा महिन्यापूर्वी एक गोष्ट सांगितली होती. प्रत्येकाला सांगितली होती. मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. आपण मुंबईला जायची हाक दिली, तेव्हा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे. काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराच्या आयुष्याचं कल्याण करू द्या”


यावेळी जरांगे पाटील भावूक झाले होते. “ मुंबईला चला, कारण मी त्याचवेळी ही गोष्ट सांगितली होती. अशी संधी पुन्हा सोडू नका. तुम्ही साथ दिली, त्यामुळे माझ्या समाजाच्या लेकरांच कल्याण करू शकतो, तुम्ही साथ दिली, जीआर घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही मी थोड्या दिवसांचा पाहुणा असो की लय दिवसांचा. मला चिंता राहिलेली नाही”

आपल्या या भाषणात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला अनेक महत्वाचे संदेश दिले. मराठा समाजाने शासक आणि प्रशासक व्हायला हवे. प्रशासनात जा, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. तसेच यावेळी मराठा आरक्षणाच्या लढ्यादरम्यान फितूर झालेल्या लोकांनाही चांगलेच फटकारले.


निवडणुकीच्या आधी हे लोक आपल्याला डिवचतात. डिवचलं की मी तिकडून उत्तर देतो. मी उत्तर दिलं की तीन ते चार महिने गप्प बसतात. त्याचा अर्थ समजून घ्या. घाबरले असं म्हणू नका. आपल्याला काळजाला लागेल असा शब्द ते बोलतात. उदाहरण म्हणून सांगतो की गुलामीचं गॅझेट म्हणणारी माकडं, भिकार औलादी. गुलामीचं गॅझेट म्हणायचं आणि तीन चार महिने गप्प बसायचं. असं जे जे बोलतात त्यांच्याबद्दल सांगतो. तुमच्या डोक्यातील किडे पडलेले जाळून टाका. आमचं गुलामीचं गॅझेट आहे तर मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.


माझ्या अर्थाचा गैर अर्थ करू नका. कुणाकडेही बोट करू नका. कारण मी बोट सुरू केल्यावर मग अवघड होईल. त्यासाठी लोकांच्या लेकराबाळांना तुच्छ लेखायचं नाही. गुलामीचं गॅझेट आपल्याला लागू केलं असं म्हटलं जातंय. म्हणजे आमच्या लेकरांनाही तुम्ही गुलाम समजता का रे हरामखोरांनो. असे असेल तर या लोकांचा प्रचार कशाला करायचा. दहा पाच हजारासाठी कशाला गुलाम बनता. कशाला त्यांच्यासोबत काम करता. तुमच्या जातीला घाण म्हटलंय, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच तुमच्या औलादीला गुलाम म्हटलं गेलंय. तुमची औलाद मराठ्यांची असेल तर त्यांच्यासोबत कशाला काम करता. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात. कशाला कुणाच्या पायाखाली काम करता, असे आवाहन करत त्यांनी मराठा समाजाला विरोध करणार्‍यांना मदत करू नका, असेही अवाहान जरांगे यांनी केले.


आमचं गुलामीचं गॅझेट आहे निजामाचं. मग इंग्रज काय तुमच्या परिवारातील आहे का? म्हणूनच तुम्ही 1931 ची जनगणना घेतली आणि त्यानेच आरक्षण घेतलं का? इंग्रजांच्या जनगणनेनं तुम्हाला आरक्षण दिलं. मग तुम्ही कोण, असं आम्ही म्हणायचं का? असा सवालही जरांगे जरांगे यांनी केला तसेच.


यावेळी जरांगे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर सरकारला इशारा दिला. अतिवृष्टीत ज्यांची शेती खरडून गेली त्यांना 70 हजार रुपये हेक्टरी तर ज्यांची शेती वाहून गेली त्यांना एक लाख 20 हजार रुपये मदत सरकारने द्यावी ती ही दिवाळीपूर्वी, पिक विमाच्या लाभासाठी जे तीन जाचक निकष लावले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावेत. अतिवृष्टीत ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांच्या नुकसानीचे प्रतवारीत नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शंभरटक्के मदत करण्यात यावी, शेती मालाला हमी भाव देण्यात यावा, शेती व्यवसायास नोकरीचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्यांची आंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी सरकारला केली अन्यथा शेतकर्‍यांसाठी आंदोलनाचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.


उस उत्पादक शेतकर्‍यांकडून टनामागे 15 रुपये कपातीच्या सरकारच्या धोरणावर जरांगे पाटील यांनी सडकून टीका करत मोठ मोठे सेलीब्रेटी, मंत्री, आमदार यांच्यासह नौकरदारांकडून कपात करण्याचा सरकारला सल्ला देत पारंपरीक राजकारण्यांच्या संपत्ती अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांमध्ये वाटप करावी. शेतकर्‍यांचे 15 रुपये कशामुळे कापता, उद्योगपती, सेलब्रेटी, राजकारणी, नौकरदारांकडून वसूली करून शेतकर्‍यांना मदत वाटप करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. अतिवृष्टीमध्ये बाधीत शेतकर्‍यांना मदत करण्याचे अवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

Comments


bottom of page