top of page

महाराष्ट्र प्रदूषण नियंतण मंडळाचा औद्योगिक अस्थापनांसाठी मोठा निर्णय; संमतीपत्र मंजूरी व नुतनीकरणाचा कालावधी केला 50 टक्क्यांनी कमी

मुंबई: राज्य शासनाच्या इज ऑफ डुईंग बिजनेस धोरणातंर्गत राज्यातील लाल, नारिंगी आणि हरित आस्थापनांच्या  उदयोग उभारणी, संमतीपत्र मंजुरी व त्याचे नुतनीकरण यासाठी मंजूर करण्याचा कालावधी हा ५० टक्क्यांपेक्षा कमी केल्याने राज्यातील औदयोगिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे.


केंद्र शासनाचे इज ऑफ डुईंग बिजनेस धोरण व राज्य शासनाने आखलेले विकसित महाराष्ट्र २०४७ या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील औदयोगिक आस्थापनांना हरित संवर्गातील उदयोग उभारणीसाठी, उदयोग  सुरू करण्यासाठी आणि सदर उदयोगांचे संमतीपत्र नुतनीकरण करण्यासाठी यापूर्वी असलेला ३० दिवसांचा कालावधी कमी करून तो १५ दिवस करण्यात आला आहे. नारिंगी संवर्गासाठी  उदयोग उभारणीसाठी  संमतीपत्र मंजूर  करण्याचा  ४५ दिवसांचा  कालावधी २४ दिवस केला असून या संवर्गातील उदयोग सुरू करणे किंवा संमतीपत्राचे  नुतनीकरण करणे  याचा ६० दिवसांचा कालावधी आता २४ दिवस केला आहे. लाल श्रेणीतील उदयोगांसाठी उदयोग  उभारणीच्या संमतीपत्रासाठी  असणारा ६० दिवसांचा कालावधी, उदयोग सुरू करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी तर संमतीपत्राचे नुतनीकरण करण्यासाठी  असलेला १२० दिवसांचा कालावधी हा आता केवळ ४० दिवस असणार आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उदयोगांची उभारणी करण्यासाठी, उदयोग सुरू करण्यासाठी आणि संमतीपत्र प्राप्त  झालेल्या उदयोगांना त्याचे नुतनीकरण करण्यासाठी यापूर्वी मंजूरीसाठी लागणारा कालावधी खूप कमी केल्याने राज्यातील  औदयोगिक प्रगतीला मोठा हातभार लागणार आहे. यापूर्वी पांढऱ्या श्रेणीत ८५० उदयोगांचा आणि निळ्या श्रेणीत  अतिरिक्त  ०९ (एकूण १७) उदयोग संवर्गाचा समावेश करून औदयोगिक आस्थापनांना मोठा दिलासा दिला होता.


मंडळाचे अध्यक्ष श्री. सिध्देश कदम यांच्या पुढाकाराने मंडळाचे सदस्य सचिव श्री. एम. देवेंदर सिंह, भा.प्र.से. यांच्या  मार्गदर्शनाखाली मंडळाच्या अधिकाऱ्यांची अभ्यास समिती स्थापन करून या अभ्यास समितीने तमिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान व गुजरात या राज्यांचा दौरा करून तेथील संमतीपत्र कार्यप्रणालीचा अभ्यास केला होता. सदरहू राज्यातील  उदयोगांची संख्या पाहता महाराष्ट्र हे राज्य हे औदयोगिक प्रगतीत अग्रेसर असले तरी ते वेगाने पुढे नेण्यासाठी उदयोगांना अत्यंत कमी कालावधीत विविध कामकाजासाठी कमीत कमी वेळात मंजूरी मिळणे  याकरीता संमतीपत्र  मंजूर करण्याचा  कालावधी अत्यंत कमी करण्याचा निर्णय मंडळाने अमलात आणला आहे.


आता संमतीपत्र मंजूरीकरीता अत्यंत कमी कालावधी लागणार असल्याने आणि फेसलेस ऑनलाईन संगणकीय प्रणालीच्या  माध्यमातून यशस्वी पाऊल उचलले असून यामुळे राज्यात औदयोगिक गुंतवणुकीला चालना मिळेल असा विश्वास मंडळाचे सदस्य सचिव श्री. एम. देवेंदर सिंह, भा.प्र.से. यांनी व्यक्त केला आहे. तर उदयोगांच्या  भरभराटीकरीता  अत्यंत कमी  वेळात  उदयोगांना आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी मंडळ नेहमीच पुढाकार घेत असते, मंडळाने उदयोगांसाठी उदयोग  मित्र धोरण हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष श्री. सिध्देश कदम यांनी केले आहे.

 


Comments


bottom of page