महाराष्ट्र हादरला: क्रूर हत्याकांड, शिवानीची बॉडी धडावेगळी; मृतदेह जाळला
- Navnath Yewale
- May 13
- 2 min read

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याला हारदवून सोडणारी एक धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात उघडकीस आली आहे. एका 20 ते 25 वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे होते. प्राथमिक तपासात हा मृतदेह कोणाचा आहे? या हत्येमागे कोणाचा हात आहे? याबबत कोणतेही धागेदारे मिळत नव्हते. मात्र पेालिसांनी फॉरेन्सिक टीम आणि गुप्त बातमीदरांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावला आहे. पोलिस तपासात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोटच्या मुलीचा खून खुद्द तिच्या पित्यानेच मुलाच्या मदतीने केल्याचे तपासाअंती स्पटष्ट झाले असून समाजात एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, मृत तरुणीचे नाव शिवानी बापुराम कळमेकर असून ती मध्यप्रदेशातील बुन्हाणपूर जिल्ह्यातील खडकनार येथील रहिवासी होती. शिवानीचा विवाह काही दिवसांपूर्वीच म्हणजे 15 एप्रिल 2026 रोजी पार पडला होता. लग्नानंतर ती सासरी गेली खरी, पण तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या वडिलांनी या हत्येचा कट रचला. शिवानीचे तिच्याच गावातील चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिचे वडील बापुराम नथ्थु कळमेकर यांना होता. याच संशयाचे पर्यवसान एका भीषण हत्याकांडात झाले. आपल्या कुटुंबाची अब्रू गेल्याच्या भावनेतून बापाने स्वत:च्या हाताने मुलीचा जीव घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी आपल्या मुलाची साथ घेतली.
हत्येच्या रात्रीचा थरार अत्यंत भयानक होता. 23 एप्रिल रेाजी रात्री वडिलांनी शिवानीच्या डोक्यात बांबूने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी बापाने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एक दिवस घरातच लपवून ठेवला. दुसर्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी त्याने आपला मुलगा अजय बापुराम कळमेकर याच्या मदतीने मोटारसायकलवर टाकून महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील राजुरा शिवारात आणला तिथे मुलीची ओळख पटू नये आणि पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने ज्यांनी तिचे शीर धडावेगळे केले आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी हत्येसाठी वापरलेले साहित्य आणि रक्ताने माखलेले कपडे जंगलात फेकून दिले जेणेकरून कोणत्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने चक्रे फिरवली. मध्यप्रदेशातील हरवलेल्या महिलांच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी खडकनार येथील कुटुंबाची चौकशी केली. त्यावेळी आरोपींची धरपकड केली असता, बापुराम कळमेकर आणि अजय कळमेकर यांनी आपला गुन्हा कबुल केला. पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पित्यानेच स्वत:च्या लेकीचा क्रूरपणे अंत केल्याने या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. कौटुंबिक कलह आणि संशयातून उद्भवणार्या अशा घटनांनी माणुसकीला काळीमा फासला आहे.



Comments