महाराष्ट्राला ऐन दिवाळीत अमित शहांकडून मदतीचा हात!
- Navnath Yewale
- 6 days ago
- 1 min read
पुरग्रस्त शेतकर्यांसाठी खुषखबर; आपत्ती मदत निधीचा हिस्सा मंजूर

महाराष्ट्रात मान्सूनने अखेरच्या टप्प्यात अनेक भागात अक्षरश: धुमाकुळ घातला. ढगफूटीसदृष्य मुसळधार पावसामुळे नद्यांच्या महापूराने शेतीपीकांचे, शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाखो एकर जमिनिवरील पीके उद्धवस्त झाली. शिवाय हजारो हेक्टर क्षेत्र जमिन खरडून गेली. त्यामुळे या शेतकर्यांना मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी ऐन दिवाळीत महाराष्ट्रात दिलासा दिला आहे. शहांनी 2025-26 साठी कर्नाटक आणि महाराष्ट्राला राज्य आपत्ती मदत निधीच्या हिस्सा म्हणून 1950.80 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. या रकमे पैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 1566.40 कोटी रुपये येणार आहेत. तर कर्नाटकला 384.40 कोटी मिळतील.
राज्य सरकारकडून यापूर्वी पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित शेतकर्यांना मदत मिळण्यास सुरूवात झाली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेला हा निधी दरवर्षी नियमितपणे कमी- अधिक प्रमाणात मिळत असतो. यावर्षी पावसामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी भरीव मदत करण्याचा स्वतंत्र प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठविला जाणार आहे. हा प्रस्ताव काही हजार कोटींच्या मदतीसाठी असेल. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.
दरम्यान, मान्सूनदरम्यान मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना तात्काळ मदतीसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफूटीमुळे प्रभावित राज्यांना सर्वप्रकारची मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी एसडीआरएफनुसार 27 राज्यांना 13 हजार 603 कोटी रुपये आणि एनडीआरएफ अंतर्गत 15 राज्यांना 2 हजार 189 कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय एसडीएमएफ आणि एनडीएमएफ अंतर्गत अनुक्रमे 21 राज्यांना 4571.30 कोटी आणि 9 राज्यांना 372 .09 कोटी रुपये जारी केले आहेत. यावर्षी मान्सून काळात बचावकार्य आणि मदतीसाठी 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनडीआरएफच्या सर्वाधिक 199 टीम तैनात करण्यात आल्या होत्या, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.



Comments