top of page

मुंबई-अहमदाबाद महामार्ग धानिवरी,महालक्ष्मी ब्रिजवर खड्ड्यात हरवला

वाहनधारकांची जीव मुठीत कसरत, प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी


डहाणू : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषतः पालघर तालुक्यातील धानिवरी ब्रिज व महालक्ष्मी ब्रिज या ठिकाणी परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पुलांच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यातून लोखंडी रॉड्स व स्टीलच्या जाळ्या बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे कधीही गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


या महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. मोठमोठे ट्रक, कंटेनर, खासगी गाड्या व दुचाकी या पुलावरून सतत धावत असतात. मात्र खड्ड्यांमुळे चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असून पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने धोका अधिकच वाढतो. स्थानिकांच्या मते, लहानमोठे अपघात येथे वारंवार घडत असून प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.


वाहनचालकांचा संताप व्यक्त होत असून ते म्हणतात, “प्रत्येकवेळी टोल टॅक्स घेतला जातो, पण सुविधा शून्य. आमच्या जीवाशी खेळून हा टोल वसूल केला जातो.”


दुरुस्तीची मागणी वारंवार केली असूनही अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत विचारले आहे की, “पालघर जिल्ह्यातील विकासकामांना नेहमीच कमी प्राधान्य दिले जाते. अपघातात जीव गमावल्याशिवाय दखल घेतली जाणार नाही का?”


नागरिकांनी प्रशासनाला तातडीने दखल घेऊन खड्डे दुरुस्त करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.

 

 

“मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी तसेच महालक्ष्मी ब्रिजवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, अन्यथा येणाऱ्या काळात धानिवरी ग्रामस्थ त्रिव आंदोलन छेडतील.”

 

शैलेश कोरडा, सरपंच, गृप ग्रामपंचायत धानिवरी

Comments


bottom of page