मुखेडमधील पुराचे बळी सत्ताधारी व अधिकार्यांचे पाप - काँग्रेस जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read
अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने सर्व सोयी सविधा उपलब्ध करण्याची मागणी.

नांदेड : मुखेड तालुक्यातील हसनाळ रावणगाव, भिंगोली , भेंडेगाव बु , भासवाडी , मुक्रामाबाद मारजवाडि भेंडेगाव खु. आदी गावात निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि या पुरात गेलेले बळी हे केवळ , संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या नाकर्तेपणाचे बळी आहेत . त्यामुळे या दोषींवर कारवाई करावी आणि अतिवृष्टीग्रस्त भागात सर्व सोयी सुविधा तातडीने पुरवाव्यात अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केली आहे.
मुखेड तालुक्यातील हसनाळ, भिंगोली , रावणगाव ,भेंडेगाव आणि परिसरातील अनेक गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने आणि धरणाची चुकीची घळ भरणी केल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात पाणी शिरले. जनजीवन विस्कळीत झाले. हसनाळ येथील तब्बल पाच जणांचा बळी गेला. शेकडो पशु पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. नागरिकांना पिण्याला पाणी आणि खाण्यासाठी अन्न उरले नाही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे . घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही तासात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर हे खा. प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्यासह हसनाळ येथे दाखल होऊन भेट दिली होती. तेथील नागरिकांना धीर देण्याचे काम ही त्यांनी केले.
मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी न लावताच केवळ राजकीय श्रेय मिळवण्यासाठी या भागाचे लोकप्रतिनिधी , जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, यांनी धरणाची घळभरणी केली. धरण विरोधी कृती समितीचा घालभरणीला विरोध होता. पण तो विरोध झुगारून देत घळ भरणी केली. यावर्षी धरणात फक्त 30 टक्के पाणी कोंडले जाण्याची खोटी माहिती नागरिकांना दिली. वास्तविक धरणग्रस्त गावकऱ्यांचे कोणतेही पुनर्वसन करण्यात आले नाही. ज्या ठिकाणी पुनर्वसनासाठी जमिनी देण्यात आल्या त्या ठिकाणी कोणत्याही नागरी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. पिण्याचे पाणी , रस्ते आणि वीज या मूलभूत गरजा ही पुरविण्यात आल्या नाहीत.
जर धरणाची घळभरणी केली नसती तर या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली नसती. हसनाळ येथील पाच नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले नसते. शेकडो नागरिक बेघर झाले नसते. लेकराबारांच्या शाळेवर नांगर फिरला नसता . पशुपालकांच्या पशूंची जीवित हानी झाली नसती. कोट्यावधी रुपयांच्या पिकांची नासधूस झाली नसती. हेकेखोरीवृतीने संबंधित अधिकाऱ्यांनी घळ भरणी केली आणि या भागात हाहाकार उडाला आहे. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत . यांना त्वरित निलंबित करावे. त्यांची खातेनिहाय चौकशी लावाव, आणि या घळभरणीसाठी पुढाकार घेणाऱ्या अधिकार्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या जलद गतीच्या दौऱ्यावर ही सरकून टीका केली आहे.
महाजन आले, पाहिले आणि गेले परंतु येथे ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांनी कोणतेही कठोर पाऊल उचलले नाही. प्रशासनाला आदेशित केले नाही. सत्ताधार्या विरुद्ध निर्माण झालेला जनतेचा रोष कमी करण्यासाठी महाजन या भागात येऊन केवळ सांत्वन करून गेले आहेत. माणसांचे मुडदे पडल्यानंतरही राज्य सरकार बघायला आणि ठोस उपाययोजना करायला तयार नसेल तर अशा निर्दयी राज्य सरकारचा ही आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो अशा भावनाही बेटमोगरेकर यांनी व्यक्त केले आहेत. यावेळी मुखेड काँग्रेस तालुकाध्यक्ष राजीव पाटील रावनगावकर, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राजन देशपांडे बारहाळी,व्यंकट वळगे ,तुकाराम सुडके , राजु पाटील कोळनूरकर, , बालाजी पाटील वसुरकर, शिवाजी गऊलवाड माकणी, मरवंत गऊलवाड, हूल्लाजी बोईनवाड, पांडुरंग भिकाने सकनुर आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी :
मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बागायती शेतीला फटका बसला असून भाजीपाला उत्पादकानाही अतिवृष्टीच्या पावसामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्वच भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक गावातील शेकडो घरांची पडझड झाली आहे . शेकडो पशु पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अशा परिस्थितीत कोणतेही पंचनामे न करता नांदेड जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत करावी अशी मागणी ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केली आहे.
Comments