मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वित्झर्लंडमधून मोठी घोषणा मुंबईत मोठा बदल होणार, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची ट्रिलियन डॉलरकडे वाटचाल
- Navnath Yewale
- Jan 18
- 2 min read

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीने विजय मिळविल्यानंतर आता महापौरपदाच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र, या धामधुमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंड गाठले आहे. आजपासून पुढील पाच दिवस ते दावोस येथे होणार्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. दावोसमधून त्यांनी मुंबईत मोठा बदल होणार असल्याची घोषणा केली आहे .
स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या स्वागत समारीांत फडणवीस यांनी महापालिका निवडणुकांमधील विजयाचा उल्लेख केला नाही. मात्र, पुढील पाच वर्षात मुंबईत कसे बदल होतील, याबाबत सूचक विधान केले आहे. मुंबईप्रमाणेच त्यांनी पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या शहरांचाही उल्लेख केला.
फडणवीस म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तयार झालेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वाधिक आयकॉनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. पुढील काळात मुंबई आपण आणखी ट्रान्सफॉर्म करणार आहोत. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की, आजपासून तुम्ही जेव्हा मुंबईला याल , तेव्हा प्रत्येक वर्षी तुम्हाला बदललेली मुंबई दिसेल. 2030 साली जगातील कुठल्याही राष्ट्राची जी राजधानी आहे, त्यापेक्षा उत्तम अशा प्रकारची मुंबई पुढच्या पाच वर्षात आपल्याला तयार झालेली दिसेल. केवळ मुंबईच नव्हे तर हे ट्रान्सफॉर्मेशन पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर , नागपूर, कोल्हापूरमध्येही दिसेल. अतिशय चांगल्याप्रकारे आपण आता आपल्या कार्याचा वेग पकडलेला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही आपली टॅगलाईनच आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र अतिशय वेगाने पुढे जाणार आहे, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात समृद्ध राज्य म्हणून पाहिले जाते. पण सांस्कृतिकदृष्ट्याही सर्वाधिक समृद्ध समाज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने केवळ भौतिकच नव्हे तर सांस्कृतिक समृद्धीही मिळवलेली आहे. खरंतर सांस्कृतिक समृद्धी टिकविल्यामुळेच भौतिक समृद्धी करू शकलो, असे फडणवीस म्हणाले. आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरकडे चालली असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, आतातरी कोणाशी स्पर्धा नाही. कारण महाराष्ट्र या स्पर्धेत खूप पुढे आहे. पुढील तीन वर्षात भारतातील पहिली ट्रलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्राची असेल. एफडीआय, निर्यात, उत्पादन, डेटा सेंटर कॅपॅसिटी, एआय, डिफेन्स उत्पादन स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे. पहिल्या क्रमांकाची ही यादी न संपणारी आहे असंही फडणवीस यावेळी म्हणाले.



Comments